को जागर्ति

एकदा एका जंगलात एका सिंहिणीनं पिलाला जन्म दिला आणि जन्म देता-देताच ती सिंहीण मरण पावली. ते सिंहाचं पिल्लू अनाथ झालं. फिरत फिरत ते एका मेंढ्यांच्या कळपात आलं. त्या मेंढ्यांनी त्या सिंहाच्या पिल्लाचा सांभाळ करायचं ठरवलं. ते पिल्लू मेंढ्यांसोबतच वाढू लागलं. त्यांच्यासारखं गवत खायला शिकलं, मोठा आवाज झाला की घाबरून पळायलाही शिकलं. एकदा त्या मेंढ्यांच्या कळपावर एका मोठ्या सिंहानं आक्रमण केलं. त्या सिंहाला त्या मेंढ्यांच्या कळपात हा सिंहाचा छावा दिसला. या मोठ्या सिंहाला आश्चर्य वाटलं. हा इथं कसा? हे मेंढ्यांप्रमाणे त्याचंही वागणं का असावं?

त्याची उत्सुकता जागृत झाली. त्या मोठ्या सिंहानं त्या बछड्याला पकडलं. त्याला घेऊन तो सिंह एका तलावापाशी आला. त्या छोट्या सिंहाला त्यानं तलावात पाहायला सांगितलं. सिंहाचं आणि आपलं प्रतिबिंब नीट न्याहाळल्यावर त्या छाव्याला जाणीव झाली. जो स्वतःला इतके दिवस मेंढी आहे असं मानत होता तो स्वतःच सिंह होता. त्या जंगलाचा अनभिषिक्त राजा होता...

आपण बहुतेक सर्वांनी ही गोष्ट ऐकली, वाचली असेल. स्व-जाणीव, सेल्फ अवेअरनेस नसल्यावर आपण सिंहाची मेंढी कसे होतो हे या गोष्टीतून लगेच लक्षात येतं. ही स्व जाणीव/ जागृति आपल्याला नेहमी होत राहावी हेच कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व असावं असं वाटतं. मी लहान असताना, देवी लक्ष्मी मध्यरात्री 'को जागर्ति?' असा प्रश्न विचारते आणि जो कोणी जागृत असेल त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला  वरदान देते असं ऐकलं होतं. देवी खरोखर रात्री १२ वाजता येऊन आपल्याला वरदान देईल या आशेनं मी काही वर्षं देवीची आतुरतेनं वाट पाहिली सुद्धा.



आज मात्र असं वाटतं की 'को जागर्ति?' हा प्रश्न रात्री 'जागा कोण आहे?' असा नसून मनानं कोण जागृत आहे असा नसेल का? ही संपत्ति देणारी लक्ष्मी खरंच संपत्ती म्हणून पैसा-अडका देते का? ही संपत्ती मूळात मनाची सजगता नसावी का?

माझ्या जमेच्या बाजू,कमकुवत बाजू, गुण-अवगुण याविषयी मी सजग असेन तर योग्य निर्णय घेऊ शकेन. मी मनाने सजग असेन तर विचार आणखी डोळसपणे पाहू शकेन.

अगदी नेहमीच्या आयुष्यात सुद्धा माझं कामाचं क्षेत्र निवडताना, काम करताना अधिक जागृत असेन. येणारा परिणाम आणखी चांगला असेल. शिवाय माझं काम मला 'काम' वाटणार नाही.

आपण स्व-जागृत असण्यानं काय होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला आपल्या इतिहासात सुद्धा दिसतं.

मदनलाल धिंग्रा हा इंग्लंडमध्ये भारतातून शिकायला गेलेला एक तरुण. त्यांचं सुदैव असं की त्यांचा संपर्क तात्याराव सावरकरांशी आला. त्याचं झालं असं-

इंग्लंड मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये सावरकर जेवायला गेले होते. त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. ते ज्या टेबलवर बसले होते त्या टेबलवरून त्यांना उठायला सांगितलं. पण माझा रंग माझा स्तर ठरवत नाहीत ही स्व-जाणीव असल्यानं; अशा गोष्टींना थारा देतील ते सावरकर कसले? स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही. ते त्या ठिकाणाहून बाहेर पडले. त्याच रेस्टॉरंटमध्ये मदनलाल धिंग्रा बसले होते. त्यांनी घडलेला प्रकार पहिला. आणि मदनलालजी सावरकरांना जाऊन भेटले. त्यांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या अपमानाची सावरकरांनी सवय करून घ्यायला हवी असं मदनलालजींनी सावरकरांना सांगितलं. ही त्यांची आणि सावरकरांची पहिली भेट. हळूहळू त्यांचा सावरकरांशी संपर्क वाढत गेला. सावरकरांच्या विचारांनी त्यांच्यात असणाऱ्या देशभक्तीला(स्व-जाणिवेला) फुंकर घातली आणि मदनलाल धिंग्रा यांनी १ जुलै १९०९ रोजी कर्झन वायलीवर गोळी चालवली जी कथा सर्वांना परिचित आहेच. स्व-जणीव आपल्याला स्वाभिमान; त्याचबरोबर जिद्द आणि सजगतेनं जगण्याचं तंत्र देते. आणि हेच त्याचं महत्त्व.

या कोजागिरीच्या निमित्तानं आपल्या सर्वांची स्व-जाणीव अजून वृद्धिंगत व्हावी, आपली कर्तव्यं आपल्याला अधिक स्पष्टपणे समजावीत, 'को जागर्ति?' हा प्रश्न लक्ष्मीनं नाही तर आपण स्वतःला दररोज विचारावा. कठोपनिषदातलं वाक्य जे विवेकानंद आपल्याला वारंवार सांगतात- "उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।" (उठा! जागे व्हा! श्रेष्ठांच्या सानिध्यात ज्ञान प्राप्त करा.) हाच सणाचा मूळ हेतू सफल करावा. 

तुम्हां सर्वांना स्व-जाणिवेला जागृत करणाऱ्या कोजागिरीच्या मनापासून शुभेच्छा!!!

अजिंक्य गोडसे,
सायकोथेरपिस्ट,
डॉ. हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

आणि माझा कचरा झाला…?