आणि माझा कचरा झाला…?
आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू. खरं तर गेली अनेक वर्षं, खूप मन लावून, मी अभ्यास केला होता. आई-बाबांचं स्वप्न होतं की मी इंजिनिअर व्हावं. म्हणून इंजिनियरिंग पूर्ण केलं आणि त्या बळावर आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू देण्यासाठी वेटिंग रूम मध्ये मी बसलो होतो. माझ्यापेक्षा जास्त अनुभव असणारे, माझ्यापेक्षा कमी गुण - जास्त गुण असणारे असे विविध प्रकारचे उमेदवार माझ्याबरोबर या इंटरव्ह्यूला आले होते. काही जणांची मुलाखत झाली होती आणि आम्ही साधारण 5 जणं राहिलो होतो. आणि माझं नांव पुकारलं गेलं. मी माझ्या टायची गाठ नीट केली आणि १० पावलं चालत जाऊन केबिनचा दरवाजा उघडला. हा दरवाजा उघडत असताना मनात माझ्या आई-बाबांच्या माझ्याकडून असणाऱ्या आणि माझ्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा याबद्दलचे बरेच विचार डोक्यात घोळत होते. मला हा जॉब मिळलाच पाहिजे अशी माझी तीव्र इच्छा होती. नाही मिळाला तर काय? याचा विचार करणं सुद्धा मी टाळत होतो. या सगळ्याचा परिणाम असेल कदाचित, मी थोडा स्ट्रेसमध्ये आलो आणि इंटरव्हू पॅनेलला गुड आफ्टरनून ऐवजी गुड मार्निंग म्हणून पहिली चूक केली.
अरे बापरे! माझं फर्स्ट इम्प्रेशन खराबच झालं असणार या विचारानं माझा ताण आणखीनच वाढला. इंटरव्ह्यू पॅनेल मला वेगवेगळे प्रश्न विचारत होतं आणि मी माझा स्ट्रेस मॅनेज करत करत उत्तरं देत होतो. तसा माझा इंटरव्ह्यू चांगलाच गेला. इंटरव्ह्यू पॅनेलनं गुड मार्निंगची चूक डोक्यात घेतली नसेल असं एकूण त्यांच्या वागण्यावरून तरी वाटत होतं. आम्ही तुम्हाला संपर्क करू असं पॅनेल हेडने सांगून माझा इंटरव्ह्यू संपवला.
३ दिवसांनी मला त्या कंपनीचा इमेल आला. काहीश्या उत्सुकतेनं आणि काहीश्या भीतीनं मी तो मेल उघडला. सिलेक्ट झालो तर आपलं किती कौतुक होईल, पण रिजेक्ट झालो तर ? हा विचार डोक्यात घोळत होता. पण त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. मला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी नकार दिला होता. त्याक्षणी मला असं वाटलं की, मला तोंड दाखवायला जागा उरली नाही. मी कचरा आहे, निकामी आहे. पण त्या कंपनीच्या इमेल मध्ये सगळ्यात शेवटी एक वाक्य त्यांनी दिलं होतं ते नजरेस पडलं आणि माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरु झाले. ते वाक्य होतं
“माणूस परिस्थितीनं अस्वस्थ होत नाही तर तो त्या परिस्थितीकडं कसं पाहतो तो दृष्टीकोन त्याला अस्वस्थ बनवत असतो. - इपिक्टेटस”
अरे खरंच की! मी जो विचार करतोय तो मला अस्वस्थ करतोय की मला मिळालेलं रिजेक्शन? त्यांनी तर मला फक्त या नोकरी साठी सिलेक्ट केलेलं नाही. पण हा तर माझा पहिलाच इंटरव्हू चा अनुभव होता. पहिल्यांदा मी ज्याप्रकारे या इंटरव्ह्यूला सामोरा गेलो त्यामध्ये काही चुका असतील सुद्धा पण म्हणून मी काहीच बरोबरच केलं नाही असं मी म्हणू शकतो का? म्हणून मला तोंड दाखवायला जागा उरली नाही हे मी म्हणणं कितपत बरोबर आहे? मला कोणी रिजेक्ट केलं तर माझा कचरा खरंच होतो का? मी कचरा असतो तर मला इंजिनियर होता आलं असतं का? मी माणूस आहे की कचरा आहे?
मला एका जॉब साठी एका कंपनीनं निवडलेलं नाहीये. ही गोष्ट वाईट नक्कीच आहे पण म्हणून मी कचरा, निकामी आणि टाकाऊ ठरत नाही. कंपनीनं या त्यांच्या मेल मध्ये मी संपूर्ण टाकाऊ आहे असं म्हंटलेलं नाही.
आणि जरी त्या कंपनीनं मेल मध्ये तुम्ही संपूर्णतः टाकाऊ आहात असं म्हंटलं असतं तरी सुद्धा त्यांचं हे म्हणणं बरोबर नसतंच. कारण कोणाचंचं असं संपूर्ण मूल्यमापन करता येणं शक्य नाही. एका कंपनीला माझा इंटरव्ह्यू आवडला नसेलही पण म्हणून मला कोणीच कधीच कोणताच जॉब देणार नाही असं घडायची शक्यता अगदीच कमी आहे. टाकाऊ माणसाला, कचरा असणाऱ्या माणसाला असा जॉब कोणीच देणार नाही.
कंपनीनं मला फक्त एका जॉब साठी रिजेक्ट केलं आहे. पण म्हणून मी स्वतःला रिजेक्ट करणं कितपत बरोबर आहे? मी स्वतःला रिजेक्ट न करता, स्वतःला कचरा न म्हणता माझ्या चुकांकडं लक्ष देऊन स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे.
मी कचरा नाहीये तर माझ्या मनात मेल वाचून स्वतःला रिजेक्ट करणारे विचार कचरा होते, उपयोगी नव्हते आणि मदतही करणारे नव्हते. स्वतःच्या नजरेत स्वतःला कचराकुंडीत न टाकता या चुकीच्या विचारांना टाकून दिलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. मी मनातल्या मनात कंपनीचे त्या इपिक्टेटसच्या वाक्यासाठी आभार मानले कारण त्या वाक्यानंच तर मला कचरा होण्यापासून थांबवलं होतं.
अजिंक्य गोडसे,
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.
या लेखामुळे स्वतः विषयी आत्मविश्वास नक्कीच वाढण्यास मदत होईल .
उत्तर द्याहटवाप्रवीण म्हेत्रे
धन्यवाद
हटवाएपिक्टेटस सोबत आपलेही आभार मानले पाहिजेत, इतक्या सुरेख पणे आपण सेल्फ वर्थ चा मुद्दा मांडलात.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवास्वतःबद्दलचे नाहक गैरसमज दुर करणारा खूप सुंदर लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाMast re
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा