न धरी शस्त्र करी


मित्रांनो, आज खंडेनवमी. आज आपण आपल्या अवजारांची पूजा करतो, यंत्रांची पूजा करतो, शस्त्रांची पूजा करतो. लहानपणापासून हा संस्कार आपल्याला मिळाला आहे. या शस्त्र-पूजनात मी अनेक आयुधांची पूजा करताना पहात आलोय. ही आयुधं पाहत असताना अनेकदा या आयुधांसोबत आणखी एक गोष्ट असली पाहिजे असं मला नेहमी वाटत आलंय. ती गोष्ट काय आहे हे तुम्हाला या प्रसंगावरून लक्षात येईलच.

महाभारतातल्या शेवटच्या युद्धापूर्वीचा प्रसंग. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही कृष्णाला भेटायला द्वारकेला आले होते. दोघांनाही कृष्णाकडून युद्धामध्ये मदतीची अपेक्षा होती. कृष्णाने दोघांसमोर दोन पर्याय ठेवले. एका बाजूला होती कृष्णाची यादवांची नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला होता फक्त कृष्ण. तो ही निःशस्त्र. दुर्योधनापेक्षा वयानं लहान असल्यानं अर्जुनाला यातून निवड करण्याची पहिली संधी मिळली. अर्जुनानं या दोन्ही पर्यायातून निःशस्त्र कृष्णाची निवड केली. अर्जुनाच्या या निर्णयाचा दुर्योधनाला फारच आनंद झाला. कारण त्याला कृष्णाची सेनाच पाहिजे होती. अर्जुनाच्या निर्णयानं त्याचं काम सोपं झालं असं दुर्योधनाला वाटलं. पण पुढील इतिहास आपण सर्वजण जाणतोच. कृष्ण होता म्हणूनच अर्जुन युद्धाला उभा राहिला. जर अर्जुनानं नारायणी सेना मागितली असती तर? जर कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली नसती तर? तर तिथं त्याला गीता सांगायला कृष्ण उपस्थित राहिले नसते. कदाचित अर्जुनानं शस्त्र टाकून दिली असती, कदाचित पांडवांचा पराभव झाला असता. म्हणजे नारायणी सेनेपेक्षा एकट्या निःशस्त्र कृष्णाचं महत्व जास्ती होतं. पण कृष्ण निःशस्त्र होता हे अर्धसत्य आहे. कृष्णानं भौतिक शस्त्र वापरलं नाही पण त्यानं त्याचं डोकं, त्याचं मन अर्जुनाची मदत करायला वापरलंचं. याचाच सर्वात जास्ती फायदा पांडवांना झाला. कृष्ण केवळ न धरी शस्त्र करी इतकंचं म्हणून थांबला नाही. कृष्ण यापुढं अजून एक वाक्य म्हणाला ते म्हणजे

न धरी शस्त्र करी|
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार||

म्हणजे आपल्याकडं केवळ भौतिक शस्त्र असणं पुरेसं नाही. त्याबरोबरच युक्तीच्या गोष्टी सांगणारं आपलं डोकं, आपलं मन हेही एक शस्त्र आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.

केवळ शस्त्र धारण करणारं मनगट बलवान असून भागणार नाही. त्या मनगटाला कार्य करायला लावणारं मनही बलवान असलं पाहिजे.

युद्ध ही केवळ भौतिक शस्त्रास्त्रांनी जिंकलं जात नाही तर त्यासोबत आपल्याला आपलं डोकं, आपलं मन आपल्याला वापरावं लागतं. आपलं मन बलवान पाहिजे म्हणजेच आपले विचार बलवान असले पाहिजेत.

जगाचा इतिहास जर आपण पहिला, मैदानावर चाललेला खेळ आपण पहिला, शिवरायांच्या चरित्राचं जर आपण नीट अध्ययन केलं तर आपल्याला सर्वत्र हेच दिसून येईल.

आपलं मन, आपले विचार हे शस्त्रचं आहे हे आता आपण पाहिलं. म्हणजे जे नियम शस्त्राला लागू होतात अगदी तेच नियम या विचारांना लागू होतात. उत्तम शस्त्र चालवण्याचा आपण नेहमी सराव केला पाहिजे. अगदी तसंचं विचार योग्य ठेवण्याचा सराव आपण नियमित केला पाहिजे. शस्त्र हे जसं दुधारी असतं अगदी तसंच आपले विचारही दुधारी असतात. आपण जर आपले विचार नीट ठेवले तर ते आपली संपत्ती बनतात पण जर विचार नीट ठेवले नाहीत तर ते आपलंच नुकसान करण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच या खंडेनवमीच्या निमित्तानं आपल्या शस्त्रांसोबतच आपण आपल्या मनाकडे, आपल्या विचारांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊयात.

सर्वाना खंडेनवमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

अजिंक्य गोडसे,
सायकोथेरपिस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?