स्ट्रेस मॅनेजमेंट
काही दिवसांपूर्वी रोहितच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितलं, तुमचा रोहित आज आम्हाला शाळेच्या वेळेत गावाबाहेर फिरताना दिसला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण दोन-तीन जणांकडून पुन्हा असंच ऐकायला मिळाल्यावर मात्रं त्यांनी आज रोहितला याबद्दल विचारलं. सुरुवातीला तो हे मान्य करत नव्हता पण खडसावून विचारल्यावर आणि शाळेत चौकशी करण्याची तंबी दिल्यावर त्याने चूक कबूल केली. आणि मला शाळेत आजिबातच जायचं नाही असं सांगायला लागला. पालकांना अजिबातच कळत नव्हतं कि याला नेमकं झालंय तरी काय? अगदी रोज आवडीनं शाळेला जाणारा रोहित सहामाही नंतर असं का वागतोय हे त्यांना कळत नव्हतं.
तसा रोहित अभ्यासात, खेळात आणि गायनात हुशार होता. आत्ता पर्यंत झालेल्या शालेय परीक्षेत त्याला उत्तम गुण मिळाले होते. परंतु या सहामाही परीक्षेत त्याचे गुण विलक्षण फरकाने कमी झाले होते. पण शाळा, मित्रं, शिक्षक यावर तो फार बोलायचा नाही. त्याचे एका विषयाचे शिक्षक ‘त्याच्या मते’ त्याला उगाचच टार्गेट करत होते. आणि हि गोष्ट सलग २-३ महिने चालली होती. आणि त्यामुळे त्याची वर्गातली ‘इमेज’ खराब होत होती. शिवाय शिक्षक चिडवतात म्हंटल्यावर वर्गातील काही मुलंही त्याला त्याच्या दिसण्यावरून चिडवू लागली होती. त्यानं हि गोष्ट त्याच्या पालकांना सांगण्याचा बराच प्रयत्न केला. पण स्वतः शिक्षक असणाऱ्या आईला हे मान्य होईना. उलट त्यालाच तिने खडसावून तुझा अभ्यास होत नाही म्हणून सर ओरडत असतील असं कारण सांगितलं. आधी वर्गात आणि आता घरात कोणीच आपलं म्हणणं ऐकून घेत नाही हे पाहिल्यावर त्याच्यावर प्रचंड ताण आला. त्याचा परिणाम असा झाला की त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं. रोजचा गृहपाठ अपूर्ण राहू लागला. आणि अजून आपला शाळेत पाणउतारा करवून घेण्यापेक्षा त्याला शाळेबाहेर राहणं जास्त बरं वाटू लागलं.
रोहितसारखी समस्या असणारी बरीच मुलं आपण आजूबाजूला पाहत असतो. सर्वसाधारणपणे या वयातील मुलांना अशा निर्माण होणाऱ्या ताणाला सामोरं जाण्याचं योग्य प्रशिक्षण नसतं. आणि जर रोहितच्या आई सारखी आई असेल तर मुलांना त्यांच्या मनातील गोष्टी पालकांना सांगण्याचीही सोय नसते. आणि यातूनच मग मुलं स्वतःला योग्य वाटेल असा मार्ग शोधतात. बरीच मुलं अशा परिस्थितीत आधी घाबरून जातात आणि नंतर परिस्थितीपासूनच पळ काढतात. या पळ काढण्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. रोहीत सारखा मुलगा शाळा चुकवतो. काहीजणं आपल्याला हे जमतंच नाही असं म्हणून त्या विषयापासून पळून जातात. आणि काहीजण अगदी टोकाचा, आत्महत्येचासुद्धा, मार्ग स्वीकारतात.
प्रत्येकाला आपण नेहमी आनंदी असावं अशी इच्छा असते. पण आपल्यासोबत घडलेली घटनाच आपल्याला दुःखी करत आहे असा जेव्हा आपल्याला वाटतं आणि घडणाऱ्या घटनेला आव्हान म्हणून न स्वीकारता तिच्याकडे समस्या म्हणून पाहू लागतो तेव्हा ताण निर्माण होतो. उत्क्रांतीच्या काळात सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना आदिमानव ३ प्रकारे सामोरं जायचा. घाबरणे (Fright), पळून जाणे(Flight) आणि लढा देणे(Fight). त्याकाळातील परिस्थिती वेगळी होती. तिथे आदिमानवाला प्रथमच एखादा वाघ समोर पाहून शब्दशः पळून जावं लागलं असेलही. परंतु नंतर स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तो त्या वाघाशी लढा द्यायला शिकला. आत्ताच्या काळात तशी परिस्थिती राहिली नाही. आपण परिस्थितीपासून पळून जाऊ शकत नाही. परिस्थितीला आव्हान समजूनच आपण तिचा सामना केला पाहिजे. तिच्याशी लढा दिला पाहिजे.
परंतु लढा देणे म्हणजे नेमकं काय? आपण शस्त्र किंवा ताकदीने लढा देणार आहोत का? नक्कीच नाही. हा लढा म्हणजे बौद्धिक लढा (Intellectual fight). पण बौद्धिक लढा म्हणजे काय? जसं आपण पाहिलं कि घडणारी घटना जेव्हा आपल्याला आव्हाना ऐवजी न सुटणारी समस्या वाटू लागते तेव्हा ताण निर्माण होतो. म्हणजेच आपला दृष्टीकोन बदलला कि आपल्या मनात तणाव निर्माण होतो. हा अयोग्य दृष्टीकोन बदलून स्वतःच्या मनात योग्य दृष्टीकोन निर्माण करणे म्हणजेच तणावाच्या बाबतीत बौद्धिक लढा देणे. ‘तुम्ही कोणत्या परिस्थितीला सामोरं जाता यानं काही विशेष फरक पडत नाही. तुम्ही त्या घटनेला कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि त्यावर काय प्रतिक्रिया देता हे महत्वाचं आहे.’ असं ताण आणि ताणक (Stressors) याविषयावर सखोल काम केलेल्या डॉ. हान्स सेल्ये यांचं म्हणणं होतं. आपल्या मुलाला त्याच्याबरोबर घडणाऱ्या घटनांकडे कसं पहायचं, त्यांच्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याचं योग्य मार्गदर्शन करणं हि सध्याच्या घडीला पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं सर्वात आधी खेळीमेळीचं आणि तणावमुक्त असेल तरच तो त्याच्या मनातील विचार तुमच्याकडं व्यक्त करू शकणार आहे. यासाठी पालकांनी सर्वात आधी आपणहून पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण अनुभव तुम्हाला जास्ती आहे, तुम्ही मोठे आहात आणि त्यामुळं तुमची जबाबदारी जास्त आहे. तुमच्याबरोबर घडलेल्या घटनांबद्दलचे विचार, तुमचे दृष्टीकोन आणि त्या परिस्थितीत तुम्ही कसे वागलात आणि जर कधी चुकला असाल तर का चुकलात हेही तुमच्या पाल्याला सांगा. यात पालकांनी कमीपणा घेण्याचं काहीच कारण नाही. घटनांकडे योग्य दृष्टीकोनातून पाहणं आणि त्यावर योग्य प्रतिक्रिया देणं यासाठी मन थोडंस शांत असावं लागतं. त्यामुळे मनाची चंचलता कमी करण्यासाठी आपल्या पाल्याकडून रोज काही मिनिटं तरी ध्यान, प्राणायाम अथवा श्वसनाच्या व्यायामाचा अभ्यास करवून घेणं गरजेचं आहे.
ताण हा कायमच आपल्याला त्रास देण्यासाठी, आपलं नुकसान करण्यासाठी आलेला नसतो हे हि आपण लक्षात घेतलं पाहिजे. वाघ समोर पाहून आलेला ताण आदिमानवाला पळून जाण्यात मदत करत होता आणि त्यामुळं आदिमानवाचा जीव वाचत होता. मुलाला परीक्षेच्या आधी आलेला ताण हा त्याला नीट अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो. अशी उपयोगी ताणाची बरीच उदाहरणं देता येतील. या उपयोगी ताणाला मानसशास्त्र यु-स्ट्रेस असं संबोधतं. ताण या विषयाकडं सुद्धा विवेकी दृष्टीकोनातून पालकांनी आपल्या पाल्याला पाहायला शिकवावं, जेणेकरून तो त्याला येणाऱ्या ताणाचा आणि त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा वापर त्याच्या प्रगतीसाठी करून घेईल. दुरुपयोगी विचारापासून उपयोगी दृष्टीकडे सुरु होणाऱ्या तुमच्या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा