संवाद कौशल्य
शिवाजी महाराजांनी जावळीच्या घनदाट खोऱ्यातील चंद्रराव मोरेची जहागीरी नेस्तनाबूत केली. त्यावेळी मोरेचा एक मावळा दोन्ही हाती दांडपट्टा घेऊन झुंझत होता. त्याच्या या आघातांमुळे महाराजांचा कोणताही सैनिक पुढे सरकू शकत नव्हता. अगदीच वेळ आली असती तर धनुष्यबाण चालवणाऱ्या सैनिकाला बोलावून त्या मावळ्याला हटवता आलं असतं. परंतु, महाराजांनी त्या वीर मावळ्याशी संवाद साधून आपलं, ‘श्रींचं’ स्वराज्य स्थापनेचं आपलं ध्येय त्याला इतक्या कुशलतेनं पटवून दिलं कि तो त्यानंतर स्वराज्याचा एकनिष्ठ पाईक बनला. पुढे तो मावळा किल्लेदार झाला. पुरंदरावर घडलेल्या त्याच्या स्वामीनिष्ठेच्या प्रसंगाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. त्या किल्लेदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे. शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर ते मुरारबाजीला धारातीर्थी पाडू शकले असते. पण त्यांनी वेगळा विचार केला. असा मोहरा मारण्यापेक्षा स्वराज्याच्या कामी आला पाहिजे हा विचार. हा वेगळा दृष्टीकोन. शिवचरित्रात असे योग्य दृष्टीकोन असणारे प्रसंग आपल्याला विपुल प्रमाणात दिसतात. या उदाहरणावरून वरून लक्षात येतं कि घडणाऱ्या किंवा घडलेल्या घटनेपेक्षा आपला त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोनच आपल्या भावना आणि पुढल्या वर्तनावर प्रभाव टाकतो. पण केवळ दृष्टीकोन असून भागत नाही. त्याबरोबरच विचार आचरणात आणण्याचं कौशल्य अंगी बाणवणं महत्वाचं. शिवाजी महाराजांचं संवाद कौशल्य किती अफाट होतं हे या उदाहरणावरून लक्षात येतं. ये हृदयीचे ते हृदयी म्हणजे काय हे सुस्पष्ट होतं.
संवाद कौशल्याची सोपी व्याख्या कशी करता येईल? आपल्या भावना, कल्पना आणि विचार प्रभावीपणे समोरच्या पर्यंत पोहोचवणं म्हणजेच संवाद कौशल्य. सध्याच्या इंटरनेट युगात आपण संवाद फक्त बोलूनच साधत नाही तर तो लिहून साधतो, वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी पाठवून, लाईक करून; आपल्या मनातल्या भावना आपण सोशल नेटवर्क वर मांडत असतो. एखाद्याचे हावभाव, हालचाल सुद्धा आपल्या बरंच काही सांगून जाते. एकूणच काय आपण सतत संवाद साधत असतो. कधी कधी आपण एकटे जरी असलो तरी मनातल्या मनात स्वतःशी आपण संवाद साधतच असतो.
मग आपल्याला हे कौशल्य कसे साधता येईल? संवाद कौशल्य प्रभावी करण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी गरजेचे असणारे काही प्रमुख मुद्दे आपण आता पाहू.
सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ऐकणे. काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकणे. समोरचा काय म्हणतोय हे नीट ऐकल्याशिवाय आपल्याला त्याचा मुद्दा समजून घेता येणार नाही. समाजात आपण पाहतो कि काहींना फक्त आपलं म्हणणं मांडायची सवय असते. ते दुसऱ्याचं अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. तर काही लोक दुसऱ्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून न घेताच पुढंचं बोलतात किंवा कृती करतात. अशा सवयींमुळे दोन्ही प्रकारच्या लोकांना बरेच तोटे सहन करावे लागतात. त्यामुळे ऐकण्याचं कौशल्य जाणीवपूर्वक अंगी बाणवणं महत्वाचं.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणाशी बोलत आहोत आणि कोणत्या प्रकारे बोलत आहोत हे ध्यानात ठेवणं. आपल्या बॉस बरोबर आपल्याला ऑफिस मध्ये मित्रासारखं बोलून चालणार नाही (काही चांगले बॉस स्वतःच कार्यालयचं वातावरण तणावरहित रहित राहावं म्हणून मित्रासारखे वागतात). आणि जर आपल्या मित्राशी आपण बॉस सारखा बोलू लागलो तर मैत्री टिकणार नाही.
यानंतरचा मुद्दा म्हणजे आपलं म्हणणं स्पष्टपणे आणि न डगमगता मांडणं. बऱ्याचदा काही लोक आपलं म्हणणं दुसऱ्यांना काय वाटेल असा विचार करून स्पष्टपणे सांगत नाहीत आणि पुलाखालून बरंच पाणी निघून गेल्यावर माझं असं मत नव्हतं असं सांगतात. आणि काहीवेळा काहीजण ठामपणा च्या नावाखाली माज करतात. अशी लोकं आपल्यापैकी प्रत्येकाला कौटुंबिक किंवा मित्रांचे-मैत्रिणींचे काही कार्यक्रम ठरवताना हमखास दिसतात. अशा लोकांबद्दल गैरसमज पटकन पसरतात. त्यामुळं गप्प बसणं किंवा काहीही गरज नसताना जोरदार उत्तर देणं यापेक्षा ठामपणा (assertiveness) स्वीकारणं महत्त्वाचं.शेवटचा आणि सर्वात महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे चांगलं बोलणं. अगदी नामदेवांनीही आपल्या अभंगात ‘बोलू ऐसे बोल| जेणे बोले विठ्ठल डोले|| असं म्हंटलेलच आहे. चांगलं, योग्य बोलायचं असेल तर योग्य दृष्टीकोन, योग्य विचार अंगी बाणवायलाच हवा. विचार आपल्या बोलण्याचा स्त्रोत असल्यानं तो जसा असतो तसा संवाद आपण दुसऱ्याशी साधत असतो. मनात एक आणि बाहेर भलतचं हे पकडलं जातंच. कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याशी छान बोलत असते पण तिच्या देहबोलीतून मात्र आपल्याला तिच्या बोलण्या-वागण्यातील विसंगती आपल्याला दिसते. आपल्यापैकी काहींनी असा अनुभव नक्की घेतला असेल. त्यामुळे आपले विचार, बोलणं आणि क्रिया जर प्रसंगानुरूप असेल तर तो नक्कीच प्रभावी सुसंवाद असेल.
मनाच्या श्लोकात समर्थ रामदास आपल्या मनाला अगदी असाच उपदेश करतात.
न बोले मना राघवेवीण काही| जनी वावुगे बोलता सुख नाही||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा