गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा
आज गणेश चतुर्थी. सर्व कला आणि विद्यांचा दाता श्री गणेशाचं आजच्या दिवशी आपल्या घरी आगमन होतं. सकल कला आणि विद्या देणारा हा गणेश गणाधिश सुद्धा आहे. गणाधिश, गणपती याचा सोप्या भाषेत अर्थ आहे लीडर. जो लीड, नेतृत्व करतो असा तो गणपती, गणाधिश. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील लीडर बनण्याचा प्रयत्न करणं हा या दिवसाचा खरा अर्थ असावा असं मला वाटतं.
चांगला लीडर व्हायचं असेल तर काय करावं लागेल?
याचं उत्तरही गणेशानंच आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला लीडर व्हायचं असेल तर आपल्याला एखादी नवीन कला, विद्या म्हणजेच कौशल्य शिकावं लागेल किंवा असणारं कौशल्य अजून उत्तम बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील हे खरं गणेश स्तवन आहे.
लीडर बनण्यासाठी कोणतं कौशल्य आत्मसात करावं लागेल किंवा उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील?
याचं उत्तर आहे life skills म्हणजेच जीवन कौशल्य. WHO नं 10 life skills सांगितले आहेत जी अंगी बाणवून आपण आपलं आयुष्य आपलं जीवन अधिक समाधानाने जगू शकू. एखादा चांगला लीडर व्हायचं असेल तर पहिल्या टप्प्यात हेच 10 life skills आपल्याला मदत करतील.
हे 10 life skills कोणते?
1.संभाषण कौशल्य(Communication Skill)
2.समस्या निराकरण(Problem solving)
3.निर्णय क्षमता(Decision Making)
4.स्व-जाणीव(Self Awareness)
5.आंतरवैयक्तिक सबंध(Interpersonal Relationship)
6.ताण व्यवस्थापन(Stress Management)
7.भावनांचं व्यवस्थापन(Emotional Management)
8.तदानुभूती(Empathy)
9.रचनात्मक विचार(Creative Thinking)
10.पृथक्करण करणारा विचार (Critical Thinking)
या सर्व life skills मधलं कोणतं कौशल्य आपल्याला सर्वात आधी शिकावं लागेल?
ते आहे भावनांचं व्यवस्थापन. भावनांचं व्यवस्थापन हे असं कौशल्य आहे की जे नसेल तर इतर शिकलेली सर्व कौशल्य आपण तितक्या चांगल्याप्रकारे वापरू शकणार नाही. हे आपल्या गाडीतल्या पेट्रोलसारखं आहे. गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी पळू शकणार नाही. आपण गाडी ढकलू शकतो पण हवा तितका वेग आपण गाठू शकणार नाही. एका प्रसंगावरून हे अजून स्पष्ट होईल. कल्पना करा की आपल्याला स्टेजवर जाऊन एक भाषण द्यायचं आहे. आपण आजपर्यंत एकदाही असं भाषण दिलेलं नाही. तर आपण काय करू? आपण संभाषण कौशल्य शिकू, चांगलं भाषण तयार करून पाठांतर करू. सगळी नीट तयारी करुन पण जर स्टेजवर गेल्यावर आपल्याला जर चिंता वाटू लागली तर?? तर आपल्याला आपलं पाठांतर कदाचित नीट आठवणार नाही. संभाषण कौशल्य तितक्या चांगल्या प्रकारे वापरता येणार नाही. म्हणूनच सर्वप्रथम भावनांचं व्यवस्थापन करायला शिकणं महत्वाचं आहे.
भावनांचं व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
सोप्या पद्धतीने आपण हे जाणून घेऊया. यासाठी वरच्याच उदाहरणाचा उपयोग करूया. समजा तुमच्या सारखे 100 लोक तुमच्या सारखीच तयारी करून स्टेज वर गेले तर प्रत्येकाला चिंताच वाटेल का? नाही. प्रत्येकाला चिंता वाटणार नाही. कारण, प्रत्येकाचा विचार, दृष्टिकोन वेगवेगळा आहे. म्हणजेच भावनांचं व्ययस्थापन म्हणजेच विचारांचं व्यवस्थापन. आपण योग्य विचार करण्याचा सराव केला तर आपण हे कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो.
कोणताही प्रसंग आपल्याला स्वतःहून भावना देत नसतो तर आपण त्या प्रसंगात कसा विचार करतो तो विचार आपल्याला भावना देतो.
चांगला लीडर बनण्यासाठी हे कौशल्य आत्मसात करणं, त्याचा सतत सराव करणं आवश्यक आहे. म्हणजे खरी गणेश चतुर्थी साजरी होईल.
सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गणपती बाप्पा मोरया🙏🏻
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा