गंगेच्याकाठी असणाऱ्या अलाहबाद शहरात एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहायचा. त्याच्या वडिलांना कुस्तीचे फार अप्रूप. आपल्या मुलानं कुस्तीत नांव कमवावं, नावाजलेला पैलवान व्हावं असं त्याच्या वडिलांना मनापासून वाटायचं. ते त्याला रोज तालमीला पिटाळायचे. त्याच्याकडून भरपूर व्यायाम करून घ्यायचे. यामुळे मुलाचं शरीर मजबूत आणि पोलादी झालं. पण मुलाला कुस्तीत आजिबातच रस नव्हता. केवळ वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांचा मार मिळू नये म्हणून केवळ तो व्यायाम करायचा. त्याची आवड होती संगीत. जसजसा तो मोठं होऊ लागला तशी त्याची संगीताकडे ओढ अजूनच वाढायला लागली. हळूहळू त्याच्या लक्षात आलं, त्याला जाणीव झाली कि संगीतच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. वडिलांच्या आग्रहाखातर आपण कुस्ती शिकू, पैलवानही होऊ, पण आपल्याला त्यामध्ये समाधान मिळणार नाही. मनाचा हिय्या करून एकेदिवशी मुलाने आपल्या वडिलांना त्याला जे वाटतं ते सांगितलं. मुलाला कुस्ती आवडत नाही हे ऐकून वडिलांना वाईट वाटलं. पण तरी त्यांनी मुलाला संगीत शिकण्याची परवानगी दिली. हा मुलगा म्हणजेच जगविख्यात बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरासिया. हरीजींना त्यांच्या ‘स्व’ ची जाणीव झाली. त्यामुळं त्यांना त्याचं ध्येय सापडलं. त्यांच्या बासरीच्या सुरांनी जग अजूनच सुंदर झालं.

हरिजी फारच नशीबवान. केवळ आपल्याला कुस्ती आवडत नाहीये इतकंच त्यांच्या लक्षात आलं नाही तर आपल्याला काय आवडतं आणि काय केल्याने आपल्याला समाधान मिळेल हेही त्यांना समजलं शिवाय त्यांच्या वडिलांनीही त्याला मान्यता दिली. खूप कमी लोकांना अशी स्व जाणीव होते. काहींना आपल्या जीवनात आपल्याला काय करायचं आहे हे लवकर समजत नाही आणि जेव्हा आपली खरी आवड आपल्याला समजते तेव्हा बराच उशीर झालेला असतो. या बरोबर काही लोकांना आपण काय करतोय आणि का करतोय, आपल्याला ते खरोखर आवडत आहे अथवा नाही हेही लक्षात येत नाही. केवळ कोणीतरी सांगत आहे, कोणीतरी त्यात नांव कमावलेलं आहे, त्या क्षेत्रात खूप पैसा आहे, खूप प्रतिष्ठा आहे या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे लोक त्या न रुचणाऱ्या मार्गावर वाटचाल करतात. त्या क्षेत्राची आवड नसल्याने बऱ्याच जणांना साहजिकच कामाचं समाधान मिळत नाही. कामाचा दर्जाही सुधारत नाही. आणि त्यामुळे आपण अपयशी ठरलो असं त्यांना वाटतं. या उलट काहींना काही कालावधीने का होईना हि आवड लक्षात येते आणि ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करून समाधानी होतात. हि आवड समजणं हा स्व-जाणीवेचा एक महत्वाचा भाग आहे. या बरोबरच स्व जाणीवेमध्ये आपला स्वभाव, आपले गुण – अवगुण, आपल्याकडं असणारं सामर्थ्य, शक्ती आणि आपल्या कमकुवत बाजू यांचा समावेश होतो. स्व-जाणीव भावनांकाचा एक महत्वाचा घटक आहे कारण समाधानाशी तो जास्त निगडीत आहे.
तर मग स्व जाणीवेचा विकास कसा करता येईल? आज आपण स्व जाणीवेचा विकास होण्यासाठी मदत करणाऱ्या एका महत्वाच्या तंत्रांबद्दल समजून घेणार आहोत. त्या तंत्राला SWOT असं म्हणतात. याची फोड पुढील प्रमाणे केली जाते. S- Strenght ताकद/शक्ती, W- Weaknesses कमकुवत बाजू, O-Opportunity संधी, T- Threats अडचणी. आता या तंत्राचा वापर आपण पाहू.

ताकदीच्या भागामध्ये आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या सामर्थ्याच्या, ताकदीच्या आणि मजबूत बाजू लिहायच्या. या तंत्रात सामर्थ्याच्या किंवा शक्तीच्या बाजू म्हणजे केवळ शारीरिक ताकद असं अपेक्षित नाही तर शारीरिक सामार्थ्याबरोबर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक सामर्थ्याच्या उल्लेख आपल्याला करायचा आहे. माझ्या आजूबाजूचे लोक कायम सकारात्मक असतात, मला खूप मित्र आहेत, माझे भाषाप्रभुत्व उत्तम आहे किंवा मी अडचणींना न डगमगता, खंबीरपणे तोंड देऊ शकतो हि एखाद्याची ताकद असू शकते. आता उजवीकडच्या संधीच्या भागात आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या ताकदीमुळे काय संधी मिळू शकतात हे लिहायचे आहे. कमकुवत बाजू च्या भागात आपल्याला आपल्या सर्व म्हणजेच शारीरक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि अडचणींच्या भागात आपल्या कमकुवत बाजूंमुळे निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या अडचणींचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. हे लिहिताना आपण आपल्या स्वतःच्या परीक्षणासाठी, चिंतनासाठी पुरेसा वेळ घेऊन, आपल्या जवळच्या मित्रांना, व्यक्तींना, नातेवाईकांना आपल्याबद्दल काय वाटते हे विचाराचे आहे. जेणेकरून आपली SWOT ची यादी व्यवस्थित होईल. एकदा हे चारही भाग व्यवस्थित भरून झाले कि आपल्याला आपल्या स्वतःबद्दल पूर्ण माहिती मिळेल. आपल्या कोणकोणत्या अडचणींना आपल्या सामर्थ्यात परावर्तीत करता येईल याचा विचार केल्यावर आपल्याला जाणवेल कि आपल्या बहुतांशी अडचणी या परिस्थिती किंवा इतरांमुळे निर्माण झालेल्या नसतात. या शिवाय या तंत्रामुळे आपल्याला नेमकं काय आवडतं, आपण काय करत आहोत, याचे परिणाम काय असतील हे आपल्याला लक्षात येईल. भविष्यात निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या अडचणी आपल्याला टाळता येतील आणि/अथवा त्यांना खंबीरपणे तोंड देता येईल.
हे तंत्र मानसशास्त्राबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. तिथे त्यांना त्यांच्या कंपनीचे विश्लेषण करायचे असते. इथे आपल्याला आपले विश्लेषण करायचे आहे. आपल्याला स्वतःला समजून घ्यायचे आहे, स्वतःची अशी योग्य आणि पूर्ण जाणीव करून घ्याची आहे जी आपल्याला आपले ध्येय समजून घेण्यासाठी आणि ते गाठण्यासाठी मदत करेल. सर्वांना ते ध्येय मिळवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
अजिंक्य गोडसे,
सायकोथेरपिस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा