उपयुक्त चिंता
उपयुक्त चिंता? हे कसले नाव आहे? चिंता उपयुक्त असू शकते? मानसिक ताणतणावासाठी आणि मानसिक आजारासाठी जर सर्वात जास्ती कोणी जबाबदार असेल तर चिंतेचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
चिंता कोणास जाणवत नाही? जगातील सर्व माणसांना, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना चिंता जाणवते. आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला आढळेल की इतिहासातील अनेक प्रसंगांना चिंतेमुळे किंवा चिंता नसल्यामुळे एक अनोखी, सुदैवी अथवा दुर्दैवी कलाटणी मिळाली आहेच. पण मग चिंता म्हणजे काय? चिंता कशाला म्हणता येईल?
मागील लेखात आपण पाहिल्या प्रमाणे आपले विचार आपल्या भावना निर्माण करत असतात तर मग कोणत्या प्रकारचे विचार चिंता निर्माण करतात? काय वाटलं की आपण चिंताग्रस्त होतो?
जेव्हा आपल्याला भविष्य नकारात्मक वाटते आणि त्या भविष्यात घडणाऱ्या नकारात्मक घटनेचा आपण सामना करू शकत नाही, ती घटना आपण सहन करू शकणार नाही असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपल्या मनात चिंता निर्माण होते.
समजा आपल्याला आपल्या ऑफिसला बरोबर अकरा वाजता पोचायचे आहे आणि वाहतुकीच्या समस्येमुळे ट्रॅफिक जॅम मुळे तुम्हाला असं वाटतं की ‘मी अकरा वाजेपर्यंत ऑफिसला पोहचू शकणार नाही आणि जरी मी ऑफिसला वेळेवर पोचलो नाही तरी चालेल कारण आज बॉसची सुट्टी आहे.’ ह्या विचाराने तुम्हाला चिंता वाटणार नाही पण थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि त्याने सांगितले कि ‘आज बॉस कामावर आलेले आहेत आणि उशिरा येथील त्यांना कदाचित ते कामावरून काढून टाकतील.’ तेव्हा तुमच्या डोक्यात असा विचार सुरू होईल की ‘मी ऑफिसला वेळेवर पोचलो नाही तर माझा बॉस मला कामावरून काढून टाकेल.’ तेव्हा तुम्हाला प्रचंड चिंता वाटू लागेल. या उदाहरणावरून वरील चिंतेची व्याख्या अजून स्पष्ट होत आहे.
चिंता असावी की नसावी?
माझ्याकडे समुपदेशनासाठी येणारे बरेच लोक हा मला प्रश्न विचारतात. या प्रश्नाचे उत्तर मी त्यांना एक उदाहरण वापरूनच देतो. समजा तुम्हाला गाडी चालवायची आहे. गाडीवर बसल्यानंतर तुम्हाला असे वाटते की ‘मला आज गाडी चालवता येणार नाही. मी कोणाला तरी धडकेल. माझा अपघात होईल.’ यामुळे तुम्ही जर चिंतीत झाला तर तुम्हाला गाडी चालवता येईल का? नाही. गाडी चालवता येणार नाही. याउलट जर तुम्ही तुमची सगळी चिंताच नष्ट केलीत आणि तुम्हाला असे वाटू लागले की ‘मी आज कशी ही गाडी चालवली तरी मला काहीही होणार नाही. मला ब्रेक वापरण्याची गरज नाही. माझा अपघातच होणार नाही.’ असे वाटले तरी चालेल का? तर हेही चालणार नाही. उलट असा विचार केल्याने अपघात होण्याची शक्यता अजूनच वाढेल. त्यामुळे चिंता खूप असूनही चालणार नाही आणि चिंता नसूनही चालणार नाही. म्हणून उत्तम कार्य करायचे असेल तर समतोल प्रमाणात चिंतेची भावना असावीच लागते. त्याला उपयुक्त चिंता असे आपण नांव देऊ. खरंतर मराठी भाषेत या उपयुक्त चिंतेला सुद्धा एक वेगळे नाव आहे. ते नाव म्हणजे काळजी. पण आजकाल आपल्या बोलीभाषेत आपण सर्रास चिंतेला काळजी असं संबोधतो. म्हणूनच लेख पटकन समजावा आणि अजून सोपा व्हावा म्हणून काळजी ला वेगळे नाव ठेवले ते म्हणजेच उपयुक्त चिंता.
शिवाजी महाराज जर अफजल खानाच्या कारवायांनी चिंताग्रस्त होऊन खानाला भेटायला गेले नसते तर काय झाले असते? कदाचित अफझल खान मारला गेला नसता आणि स्वराज्याचे स्वप्न धूसर झाले असते. समजा जर शिवाजी महाराज अजिबात चिंताग्रस्त न होता, वाघनखे न बाळगता, अंगरक्षकांच्या खेरीज जर खानाला भेटायला गेले असते तर? आपण याचा विचारही करू शकत नाही. इथे शिवाजी महाराजांचे वेगळेपण, थोरपण आपल्याला लक्षात येते. त्या प्रसंगी शिवाजी महाराजांनी बाळगली समतोल आणि उपयुक्त चिंता. अशी महाराजांची उपयुक्त चिंतेची वाघनखे आपण बाळगू आणि आपल्या जीवनात समतोल आनंद मिळवू.
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा