करूया ताणाचा सामना
एका ऑफिसमध्ये एक प्रचंड शिस्तीचे साहेब होते. जरा सुद्धा कामात चूक झाली तर साहेबांसमोर धडगत नसायची. ऑफिसमधले सगळे साहेबांना प्रचंड घाबरायचे. एक दिवस ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शुभमला साहेबांनी एक महत्वाचं पत्र लिहायला सांगितलं. शुभमनं डोळ्यात तेल घालून अत्यंत वळणदार अक्षरात ते पत्र लिहिलं. दोन-दोन वेळा तपासून त्यानं ते पत्र साहेबांकडं पाठवलं. दहा मिनिटात साहेबांचा शिपाई शुभमकडे आला आणि म्हणाला कि तुम्हाला साहेबांनी ताबडतोब बोलवलं आहे. हे ऐकून शुभमला खूपच चिंता वाटायला लागली. शुभमला टेंशन आलं. आणि त्यानंतर शुभम साहेबांना न भेटता अर्धी रजा टाकून तो घरी निघून गेला. टेंशन आल्यावर शुभम असा का वागला? या परिस्थिती पासून पळ काढल्याचा त्याला फायदा होईल कि त्यानं अजून काही करायला हवं होतं?
हे शोधायला आपण थोडं इतिहासात जाऊयात. उत्क्रांतीच्या
काळात सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना, ताणाला, टेंशनला आदिमानव कसा सामोरं जात असेल?
समजा त्याचा सामना एका वाघाशीच झाला. तर तो या वाघाला कसा सामोरं जात असेल? या
किंवा अशा ताणाच्या प्रसंगात आदिमानव पहिल्यांदा घाबरायचा. त्यानंतर त्याच्यासमोर
२ पर्याय असायचे एकतर पळून जाणं किंवा लढा देणं. जरी आदिमानवानं पळून जाण्याचा
पर्याय निवडला तरी तो आपला जीव किती वेळ वाचवणार? नक्कीच फार नाही. वाघ आल्यावर
पळून जाणं हा पर्याय फार काळ उपयोगाचा नव्हता. त्यामुळं उरायचा एकमेव पर्याय- लढा देणं.
लढा दिल्यानं जीव वाचण्याची संधी नक्कीच जास्ती होती. कालान्वये वाघ समस्या राहिला
नाही. पण समस्या येतच राहिल्या, ताण येतच राहिला. परंतु, ताण आल्यावर वापरायची;
घाबरा, पळून जा किंवा लढा द्या; ही ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या मेंदूत तशीच राहिली. सध्याच्या
परिस्थितीत आपण शब्दशः परिस्थितीपासून फारवेळा पळून जाऊ शकत नाही.
आणि जरी पळून गेलो तरी समस्या सुटत नाही किंवा ताणही संपत नाही. म्हणून ताण
निर्माण करण्याऱ्या परिस्थितीला आव्हान समजूनच आपण तिचा सामना केला पाहिजे.
तिच्याशी लढा दिला पाहिजे.
परंतु लढा देणे म्हणजे नेमकं काय? आपण शस्त्र किंवा ताकदीने लढा देणार आहोत का? नक्कीच नाही. हा लढा म्हणजे बौद्धिक लढा (Intellectual fight). पण बौद्धिक लढा कसा द्यायचा? आपला स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? आपलं टेंशन कसं कमी करायचं?
हे समजून घेण्यासाठी आपण वरच्याच
उदाहरणाचा उपयोग करूया. आपल्याला शुभम त्याचं टेंशन, चिंता कशी कमी करू शकेल हे
पहायचं आहेच. त्यासाठी आधी आपण शुभमला चिंता का वाटायला लागली, त्याला टेंशन का
आलं हे शोधायला पाहिजे. साहजिकच साहेबांच्या बोलवण्यामुळं हे झालं असेल असं आपल्यापैकी
अनेकांना असं वाटू शकतं. पण हे नक्की बरोबर आहे का? समजा, शुभमच्या प्रसंगात त्याच्यासारखे
१०० लोक असते तर प्रत्येकाला कोणत्या भावना आल्या असत्या? साहजिकच
प्रत्येकाला वेगवेगळ्या भावना येऊ शकतात. कुणाला राग येऊ शकेल; काही जणांना अपराधीपणाची
भावना येऊ शकेल; काहीजण निर्धास्त असतील; तर काही जणांना डोळ्यासमोर मेमो दिसेल आणि
त्यानं भीतीनं गाळण सुद्धा उडू शकेल. म्हणजेच प्रत्येकाला येणाऱ्या भावना नक्कीच वेगवेगळ्या
असतील. थोड्या जणांना शुभम सारखी चिंता सुद्धा वाटू शकते. पण जेवढी चिंता शुभमला वाटेल
अगदी तेवढीच चिंता त्यांना वाटेल का? नक्कीच नाही. काहींना शुभमपेक्षा
चिंता कमी वाटेल आणि काहींना शुभमपेक्षा जास्ती सुद्धा चिंता वाटू शकेल; त्या वाढीव चिंतेचा परिणाम कोणीतरी ऑफिस मधून रजा न टाकता पळून सुद्धा जाऊ
शकेल.
म्हणजेच प्रत्येकाला वाटणारी भावना आणि
त्या भावनेची तीव्रता वेगवेगळी असेल. जर प्रसंग समान आहे तर प्रत्येकाला वाटणारी भावना
आणि त्याची तीव्रता वेगवेगळी का आहे? याचं उत्तर आहे दृष्टीकोन, विचार. आपला स्ट्रेस मॅनेज करणारी, टेंशन कमी
करणारी, भावनांचं नियमन करणारी गोष्ट म्हणजे आपले विचार, आपले
दृष्टीकोन.
कोणत्याही प्रसंगात आपण कशा प्रकारचा विचार करतो तो विचारच आपल्याला येणाऱ्या भावना आणि त्यांची तीव्रता ठरवत असतो.
म्हणून ताणाच्या प्रसंगात बौद्धिक लढा द्यायचा
असेल तर आपल्याला प्रामुख्यानं आपल्या विचारांकडं लक्ष द्यायला हवं. शुभमच्या विचारांचा
परिणाम त्याला चिंता वाटत होती. हे त्याचे विचार कोणते होते? त्याचा विचार कदाचित असा
असेल कि माझी काहीतरी चूक झाली असेल, साहेब मला ओरडतील आणि आता
माझी काही खैर नाही. या विचारांमुळं त्याला चिंता आली असेल. हे विचार योग्य आहेत कि
अयोग्य?
विचार तपासण्याचं एक सोपं तंत्र आपण आज
पाहूयात. शुभमच्याच प्रसंगाचा यासाठी आपण उपयोग करू. प्रथम, आपल्याला पाहावं लागेल
कि हा विचार शुभमची कार्यक्षमता वाढवत होता कि कमी करत होता? साहजिकच हा विचार त्याची कार्यक्षमता कमी करत होता. हा विचार त्यांना चांगलं,
योग्य काम करायला लावत होता कि त्यापासून रोखत होता? नक्कीच त्यापासून रोखत होता. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा जो विचार होता कि
साहेब मला ओरडतील हा कोणत्या काळाबद्दलचा विचार होता? तर तो भविष्यकाळाबद्दल
असणारा विचार होता. शुभम भविष्यात जाऊन आला नव्हता. म्हणजे त्याला येणारा हा विचार
खरा नव्हता तर हे फक्त त्याचं मत होतं. आपणही अनेकदा असं करतो. आपल्या मनात येणाऱ्या
विचारांना आपण खरं मानतो. ते आपले फक्त विचार आहेत किंवा ती आपली केवळ मतं आहेत असं
आपण त्यांच्याकडं पाहत नाही. त्यावेळी आपले विचार वास्तवाला धरून रहात नाहीत. म्हणून
शुभमला चिंता वाटू लागली.
जे विचार आपली कार्यक्षमता वाढवत नाहीत, आपल्याला चांगलं, योग्य काम करायला लावत नाहीत आणि जे विचार वास्तवाला धरून नसतात असे विचार चूक असतात आणि ते तशाच चुकीच्या भावना तयार करतात आणि आपला स्ट्रेस वाढवतात.
या अयोग्य विचारांचा परिणाम शुभमला
चिंता वाटू लागली. या ऐवजी शुभमने जर असा विचार केला असता कि माझी काहीतरी चूक झाली
असेल, साहेब मला ओरडतील हा
माझा फक्त एक विचार आहे खरी गोष्ट नाही कारण मी काही भविष्यात जाऊन आलो नाही. तर
शुभमला चिंता वाटली असती पण ती इतकीही तीव्र नसती कि ज्याचा परिणाम तो ऑफिस मधून
पळून गेला असता. असा विचार आला असता तर नक्कीच शुभम जाऊन साहेबांना भेटला असता.
साहेबांचं म्हणणं त्यानं ऐकून घेतलं असतं. कदाचित साहेबांनी त्याचं कौतुक करायला
हि त्याला बोलावलं असू शकलं असतं. नाही का?
आत्ता आपण भविष्याबाबतची वैचारिक चूक
आपण पहिली. आपण अशा विविध वैचारिक चुका करत असतो. आपण अशा अजून दोन वैचारिक चुका
पाहूयात. साहेबांनी मला बोलावलं आहे म्हणजे माझी नक्की काहीतरी चूक झाली असणार आणि
आता साहेब माझा फडशा पडतील असा विचार जर शुभमनं केला असता तर याचाही परिणाम शुभम
काहीतरी चुकीचंच वागला असता. आपण शुभमचे हेही विचार तपासून पाहूयात. आपलं विचार
तपासायचं परिमाण आता वरतीच आपण ठरवलं आहे. हे विचार शुभमची कार्यक्षमता वाढवत होते
का? नक्कीच नाही. शुभमचे हे विचार वास्तवाला धरून होते का? साहेब फडशा पडतील हा
विचार वास्तवाला धरून आहे का? नक्कीच नाही. साहेब काही राक्षस किंवा वाघ नाहीत. जे
शुभमला खाऊन टाकतील किंवा त्याला फस्त करतील. पण शुभम त्याचा विचारांनी साहेबांकडून
पुढे होऊ शकणाऱ्या कृतीची तीव्रता वाढवत होता. कारण साहेब ओरडू शकतात, बोलू शकतात,
फार फार तर कामावरून काढून टाकू शकतात पण फडशा नक्कीच पडणार नाहीत. शुभम इथं जी
वैचारिक चूक करत होता ती म्हणजे तो अतिशयोक्ती करत होता. या ऐवजी जर शुभमनं असा
विचार केला असता कि साहेबांनी मला बोलावलं आहे म्हणजे माझी काहीतरी चूक झालेली असू
शकते पण म्हणून साहेब मला ओरडतील, माझी चूक दाखवून देतील पण हे माझ्या फायद्याचंच
असणार आहे. तर शुभम परिस्थितीला सामोरं गेला असता.
दुसरी वैचारिक चूक म्हणजे अवास्तविक
सकारात्मक विचार. जर शुभमने असा सकारात्मक विचार केला असता की माझं अक्षर पाहून साहेब
माझ्यावर प्रचंड खुश झालेले असतील आणि आता मी कसंही वागलं तरी चालेल. तर काय होईल? कदाचित या विचारांवर विश्वास
ठेवून शुभम त्यानुसार वागला तरीही त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहेच. कारण हे ही
विचार त्यांची कार्यक्षमता वाढवत नाहीत, चांगलं, योग्य काम करायला लावत नाहीत आणि वास्तवाला धरून नाहीत. आणि याचा परिमाण आपला
ताण वाढेलच. म्हणजे उगाच ओढून ताणून केलेले सकारात्मक विचार उपयोगी विचार नाहीत. आपण
विचारांचं सकारात्मक किंवा नकारात्मक असं विभाजन न करता योग्य किंवा अयोग्य असं विभाजन
केलं पाहिजे.
आपल्याला योग्य असणारे सकारात्मक आणि नकारात्मक
असे दोन्ही प्रकारचे विचार हवे आहेत. म्हणून भविष्यकाळाबद्दल समतोल अंदाज व्यक्त करणारा,
अतिशयोक्ती नसणारा आणि वास्तवाला धरून सकारात्मक असणारा योग्य विचारा आपण केला तर आपला
योग्य प्रकारे स्ट्रेस मॅनेज होण्यास मदत होईल. आप ताणाचा सामना चांगल्याप्रकारे
करू शकू.
अजिंक्य नितीन गोडसे,
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रूग्णालय, इचलकरंजी.
छान लेख
उत्तर द्याहटवा