विचार, भावना आणि समस्या

आज आपण आपल्या विचार आणि भावनांवर चर्चा करणार आहोत. सहाजिकच आपलं ध्येय मानसिक आरोग्य टिकवणे असे असल्याने प्रामुख्याने आपण मानसिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावनांचा विचार करू. हा विषय मांडताना कॉग्नेटिव्ह बिहेविअरल थेरपी (विचार-वर्तन-मानसोपचार पद्धती) म्हणजेच CBT विचार आणि भावनेकडे कोणत्या दृष्टीने पाहते आणि विचार आणि भावनांचा उपचार सीबीटी मध्ये कसा केला जातो याविषयी सुद्धा पाहणार आहोत.


भावना म्हणजे काय आणि भावनांचा उगम

सीबीटी नुसार विचारांच्या मुळे होणारी मनाची अवस्था म्हणजेच भावना होय. याचाच अर्थ भावनेचा उगम हा विचारांमध्ये असतो. जसा आपण विचार करतो तशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि ही भावनाच आपल्याला वर्तन करण्यासाठी प्रेरित करत असते. यालाच विचार-भावना-वर्तन त्रिकोण असे म्हणतात.

 याचाच अर्थ एखाद्या प्रसंगातील आपले वर्तन हे त्या प्रसंगात घडणाऱ्या घटनांमुळे होत नसते. तर त्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो आणि काय विचार करतो यावर अवलंबून असते.

हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा वापर करू. यश ने एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला पाच मिनिटे एका विषयावर बोलायचे आहे. त्याला स्टेजवर जाऊन बोलणे अवघड वाटत होते म्हणून स्पर्धेच्या ठिकाणाहून तो त्याच्या भाषणाच्या अगोदर त्या ठिकाणाहुन पळून गेला. तो त्या ठिकाणाहून पळून गेला याचे कारण काय असावे? कदाचित त्याला वाटणारी चिंता. पण स्पर्धेमुळे चिंता वाटली असे म्हणणे योग्य ठरेल का? स्पर्धा आहे म्हणजे इतरही काही मुले तेथे बोलावयास आली असतील. सर्वच मुले पळून गेली असतील का? सर्वांनाच चिंता वाटली असेल का? नाही. नक्कीच नाही. जर सर्वच मुले पळून गेली नाहीत आणि जर सर्वांना चिंता वाटली नाही तर याचे काय कारण? नक्कीच काही मुलांना उदास वाटले असेल, काही दुःखी झाली असतील, काही मुले उत्साही सुद्धा झाली असतील, तर काही आपल्याला स्टेजवर जाऊन कसे बोलू याविषयी काळजी करत असतील. त्या मुलांना आलेल्या त्या त्या भावनेनुसार त्यांचे तसे तसे वर्तनही झाले असेल. पण नक्कीच सगळे चिंतीत होऊन पळून गेले नसतील. असे का झाले? सर्वजण वेगवेगळे का वागले? याचे उत्तर आहे विचार. यशला त्या प्रसंगात ‘मला स्टेजवर जाऊन बोलणे जमणार नाही. मी चुकलो तर लोक मला हसतील. लोक मला हसले तर ते अपमानास्पद असेल.’ असा विचार आला आणि त्यामुळेच त्याला चिंता भेडसावू लागली.

यावरून हे स्पष्ट होते की कोणताही प्रसंग आपल्याला दुःखी, आनंदी, कष्टी, उत्साही करत नाही. कोणत्याही प्रसंगामुळे आपल्याला भावना येत नाहीत. याउलट विचारच भावनेला जन्म देतो आणि ही भावनाच वर्तनाला चालना देते.

एखाद्याचे वर्तन आपल्याला दिसू शकते. भावना आणि विचार दिसू शकत नाहीत. त्यामुळे आपण त्याच्या नकारात्मक वर्तनाला दोष देतो आणि ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो. पण त्यातून थोडेफार यश हाती येते आणि नकारात्मक विचारांची खरी समस्या सुटतच नाही.

खरा दोष हा वर्तनाचा नसून त्याच्या मागचा विचारांचा आहे.

त्यामुळे समस्या सोडवायची असेल तर वर्तनाबरोबरच किंबहुना वर्तनापेक्षा थोडे जास्त आपल्याला आपल्या विचारांवर आणि भावनेवर काम करावे लागेल.

अजिंक्य गोडसे,
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?