कसा थांबवायचा चालढकलपणा?

लहानपणी आपण सगळ्यांनी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. अजून थोडं पळाल्यानंतर आपण जिंकू हे माहिती असून सुद्धा सशाने पळण्याचा कंटाळा केला. त्यामुळे कमी वेगात पण न थांबता चालणार कासव जिंकलं. ससा आणि कासवाची ही गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेला चालढकलपणाचा पहिला धडा होता. सध्याच्या वेगवान युगात, आपल्या ऊर्जेचे सर्वात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते म्हणजे चालढकलपणानं. 

चालढकलपणा म्हणजे महत्त्वाची कामे टाळून शुल्लक गोष्टी करत बसणं.

हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. पहाटे उठून व्यायाम न करता झोपून राहणं, अभ्यास महत्वाचा आहे हे माहिती असून सुद्धा सतत टीव्ही पाहत राहणं अशी काही चालढकलपणाची उदाहरणे आहेत. याबरोबरच आपल्याला आवडणारी पण हानिकारक किंवा शुल्लक असणारी एखादी गोष्ट आपली गैरसोय होईल, कदाचित आपल्याला बैचेन वाटेल या चिंतेमुळे आपण न थांबता करत राहतो यालाही चालढकलपणाच म्हणतात. फेसबूक, व्हॉट्सऍप, पबजी, व्यसनं ही या चालढकलपणाची काही उदाहरणे आहेत. चालढकलपणामुळे आपला वेळ आपण वाया घालवतो आणि अगदी शेवटच्या क्षणी घाई गडबडीत आपलं काम आपण पूर्ण करतो. बहुतेक कॉलेजमधली मुलं त्यांच्या असाईनमेंट्स अशाच पद्धतीने पूर्ण करतात. मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना अनेकदा असाईनमेंट्स अशाच पद्धतीने पूर्ण केल्या आहेत. म्हणजे चालढकलपणा तसाच राहिला केवळ बॅचेस बदलल्या, लोकं बदलली. चालढकलपणाच समर्थन करताना काहीजण असं म्हणतात की ऐनवेळी आम्ही ते करतोच, त्यानं आमचं कुठं काय बिघडलं? पण आपण केवळ बिल भरणं असेल, गृहपाठ करणं असेल अशाच गोष्टी ऐनवेळी करू शकतो. परंतु त्यावेळी जर गडबडीत एखादी चूक झाली तर ती आपल्याला भलतीच महागात पण पडू शकते. काही गोष्टी, जसं कि वजन, हे काही ऐनवेळी कमी होत नाही. त्यासाठी कासवासारखे थोडसंच पण सतत काम करावं लागतं.

तसं पाहायला गेलं तर चालढकलपणा ही फार गमतीशीर गोष्ट आहे. पहाटे व्यायाम करायला आपण चालढकलपणा करू पण तेच ट्रिपला जायचं असेल, दिवाळीत असेल किंवा परीक्षेच्या दिवशी मात्र आपण नक्की हमखास पहाटे उठू याचं कारण काय असेल? व्यायामासाठी पहाटे उठणं ही गोष्ट कंटाळवाणी असेल, गैरसोय करणारी असेल, न आवडणारी असेल तर दिवाळी, परीक्षा यावेळीही पहाटे उठणं आपल्याला आवडणारच नाही. तरी पण मग आपण का उठतो? याचं कारण आहे ते म्हणजे आपण शोधत असलेल्या पळवाटा, आपण स्वतःला देत असलेली कारणं. 

पहाटे व्यायामासाठी न उठायला आपण स्वतःला अनेक कारणं देतो पण हेच कारण जर ट्रीप, परीक्षा असेल तर मात्र चालढकलपणानं आपलं नुकसान होईल हे आपल्याला माहीत असल्याने आपण त्या वेळी कोणतेही कारण न देता लगेचच उठतो.

खरंतर व्यायामासाठी न उठता कारणं देण्यानं भविष्यात आपलं नुकसान होणार आहे हे आपल्याला माहीत असतं आणि तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालढकलपणा करतो. कारण आपण बहुतेकदा दूरच्या-दीर्घकालीन फायद्याकडं दुर्लक्ष करून लगेच मिळणाऱ्या-अल्पकालीन गैरसोय, नावाडीकडे लक्ष देतो. हीच गोष्ट आपल्याला दीर्घकालीन नुकसानीकडे घेऊन जाते.

म्हणूनच चालढकलपणाला स्लो पॉइझन- हळू हळू भिनणारं विष असंही म्हणतात.

सीबीटी म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी (विचार वर्तन उपचारपद्धती) ही एक मानसोपचार करणारी पद्धत आहे. जगात सर्वात जास्त वापरली जाणारी आणि अत्यंत प्रभावी व लवकर गुण देणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये तिचा समावेश होतो. चालढकलपणात निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं गतिज ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी म्हणजेच चालढकलपणा वर मात करण्यासाठी सीबीटी मध्ये खूप मौलिक संशोधन झालं आहे. त्यातून चालढकलपणा बाबतची अनेक तथ्यं समोर आली आहेत. त्यापैकी काही गोष्टी आपण आता पाहू.

आपण स्वतःला देत असलेल्या कारणांमुळे चालढकलपणा करतो हे आपण पाहिलंच, त्याचबरोबर चालढकलपणाचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चालढकलपणा टाळल्यामुळे आपली गैरसोय होईल, जो त्रास आपल्याला होईल त्या त्रासाकडे आपण संकट म्हणून आपत्ती म्हणून पाहतो. व्यसनाबाबत चे उदाहरण द्यायचं झाल्यास मी जर आज व्यसन केलं नाही तर होणारा त्रास मी सहनच करू शकणार नाही असं व्यसन करणारा कारण देतो. सकाळी उठण्याचे उदाहरण पाहताना थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. मी जर पहाटेचा गजर वाजल्या वाजल्या उठलो तर काय होईल याचा आपण थोडा विचार करू. आपल्याला असं वाटेल की माझी झोपच पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे येणारा व्यस्त-खूप कामाचाअसणारा दिवस मला फारच अवघड जाईल अशी कारणं देऊन आपण परत झोपी जातो. या अशा पराचा कावळा केलेल्या म्हणजेच सहनशक्ती कमी करून वाढवणाऱ्या विचारांमुळे आपला चालढकलपणा हा सुरूच राहतो.

चालढकलपणावर उपाय म्हणजे स्वतःला देत असलेली कारण बंद करणं, पळवाटा सांगण्याचं थांबवणं ही पहिली पायरी आहे.

दुसऱ्या पायरीवर चालढकलपणा टाळणं म्हणजे काही भयंकर नाही, केवळ गैरसोय करणार आहे, पण फायद्याचं आहे हे स्वतःला समजावणं. आणि तिसरी पायरी म्हणजे लगेच मिळणाऱ्या फायद्यापेक्षा दीर्घकालीन फायदा लक्षात ठेवून काम करणं.

चालढकलपणा हा आपल्या मानवी ऊर्जेचे नुकसान करणारा एक उपद्रवी घटक आहे जो नैराश्यासारख्या मानसिक रोगांकडे घेऊन जातो.

 त्यामुळे आपल्या ऊर्जेला योग्य वळण लावायचं असेल आणि योग्य मार्गी ती वापरायची असेल तर चालढकलपणा वर मात करावीच लागेल.


अजिंक्य नितीन गोडसे,
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

  1. खूपच छान लेख याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल

    उत्तर द्याहटवा
  2. ससा आणि कासवाच्या गोष्टींपासून असे लिखाण तूच करू शकतोस. आजकालच्या मुलांचे परफेक्ट निरीक्षण तू इथे केले आहेस. पण काही अपवाद असतात. मला तू लिहिलेलं खूप पटले आहे. आपण बोलू या बिषयावर 👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?