प्लॅस्टिकसारखे मज्जातंतू आणि मेंदू
प्लॅस्टिकसारखे मज्जातंतू हे वाचताना थोडं वेगळं नांव वाटलं ना? काही जणांना कदाचित विचित्रसुद्धा वाटू शकेल. पण खरोखर आपल्या मेंदूतले मज्जातंतू प्लॅस्टिकसारखेच असतात. मेंदूतील साधारण ८०% भाग हा मज्जातंतूंचाच बनलेला आहे. हे मज्जातंतू आपल्या मेंदू मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांसारखे किंवा वायरिंग सारखे असतात. आपल्या विचार- भावना- वर्तणुकीवर मज्जातंतूंचा प्रभाव हा जास्त आहे. प्लॅस्टिक आपण गरम केलं कि हवं तसं वाकवू शकतो, त्याला हवा तसा आकार देऊ शकतो अगदी तसंच आपण जर आपण कष्ट घेतले तर आपल्याला मेंदूतील मज्जातंतूंना जसे हवे आहेत तसे बदलू शकतो. याला इंग्रजी मध्ये न्युरोप्लास्टिसिटी असं म्हणतात.
न्युरोप्लास्टिसिटी नुसार, जेंव्हा आपण एखादी नवी गोष्ट शिकतो तेव्हा आपण आपल्या मेंदूमध्ये मज्जातंतूंची एक पाउलवाट तयार होते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पाऊलवाटेने प्रवास करायला रस्त्यापेक्षा नक्कीच जास्त वेळ लागतो. त्या पाऊलवाटेचे रुपांतर रस्त्यामध्ये करायचे असेल तर आपल्याला ती पाउलवाट सतत वापरावी लागते. खूप दिवस ती पाउलवाट वापरल्यानंतर हळूहळू त्याचा कच्चा रस्ता तयार होतो. त्या कच्च्या रस्त्यावरती खूप जास्ती वाहतूक होऊ लागली की त्यानंतर त्या रस्त्याचे वाहतुकीच्या सोयीसाठी डांबरीकरण केले जाते. असं करता करता एक दिवस ती पाऊलवाट पक्का रस्ता बनते. असंच काहीसं आपल्या मेंदूत घडत असतं. हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरण पाहू. वय वर्षे ३५ असणाऱ्या सुरेशने पहिल्यांदाच गियरची गाडी चालवली. इथे सुरेशच्या मेंदूने गाडी चालवायची मज्जातंतूंची एक नवी पाऊलवाट तयार केली. पण पहिल्यांदाच गाडी चालवली की लगेच गाडी चालवता येते का नाही तर तिच्यासाठी आपल्याला गाडी चालवण्याचा सारखा सारखा सराव करायला लागतो. जितक्या वेळा आपण सराव करू तितक्या वेळा आपल्या मेंदूमधून मज्जातंतूंच्या पाऊल वाटेने आपण प्रवास करतो. हा प्रवास जितका होईल तितका लवकर त्याचा पक्का रस्ता तयार होतो. त्यामुळे गाडी चालवण्याचा खूप चांगला सराव सुरेशने केला तर त्याला ती चांगल्या पद्धतीने चालवता येईल. कारण त्याच्या मेंदूमध्ये मज्जातंतूंचा पक्का रस्ता तयार होईल. म्हणून एखाद्या गोष्टीचा आपण खूप सराव केला तर आपण हळूहळू त्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवू शकतो. मज्जातंतूत तयार होणाऱ्या या रस्त्याला न्युरोपाथवे असं म्हणतात.
वरील उदाहरण आपल्याला चांगल्या गोष्टींचा न्युरोपाथवे कसा करायचा याचं विज्ञान सांगतं. वाईट गोष्ट अशी आहे विज्ञान हे चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही गोष्टींना समान वागणूक देते. त्यामुळेच हा न्युरोपाथवेचा नियम वाईट गोष्टींना, चुकीच्या सवयींना सुद्धा तसाच लागू पडतो. व्यसने करणे, चालढकलपणा करणे, भीतीपोटी गोष्टी टाळणे इ. सर्व गोष्टींच्या मागे आपण खूप प्रयत्नांनी बांधलेला मज्जातंतूंचा पक्का रस्ताच आहे. त्यामुळेच काही लोकांना सकाळी लवकर उठण्यापेक्षा आळस करणे, झोपून राहणे सोपे वाटते. कारण आळशीपणाचा मार्ग खूप मजबूत आहे आणि लवकर उठण्याचा मार्ग तयारही झालेला नाही. पण चांगली गोष्ट अशी आहे कि वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आणि कधीही आपण नवा न्युरोपाथवे तयार करू शकतो आणि जुना वापरणे बंद करू शकतो. ह्या आशा वाईट मार्गाचा वापर बंद करण्यासाठी साहजिकच आपल्याला नवी, चांगली पाउलवाट तयार करावी लागेल आणि त्या पाउलवाटेचे पक्क्या रस्त्यामध्ये रुपांतर होईपर्यंत कष्ट घ्यावे लागतील.
इतकं सर्व सोपं दिसत असलं तरी आपल्या मेंदूने यात एक मेख मारून ठेवलेलीच आहे. जर तुम्ही पक्क्या रस्त्याचा वापर बंद केलात तर तो रस्ता हळू हळू पुन्हा पाउलवाट होऊ लागतो. जुने तयार झालेले रस्ते जे सध्या वापरत नाहीत ते पुन्हा पाउलवाट होतात. पण हि पाउलवाट कधीच नष्ट होत नाही. आणि यामुळेच वाईट सवयींकडे वळण्याची भीती कायम असतेच. आणि म्हणून आपले चांगले पक्के रस्ते आपल्याला सतत वापरावे लागतात. या माहितीचा आपण योग्य वापर करूया. आपल्याला चांगल्या गोष्टीवर, योग्य सवयींवर प्रभुत्व मिळवून आयुष्यात यशस्वी होऊया. सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
अजिंक्य नितीन गोडसे,सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.
छान व माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान माहिती
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाकन्सेप्ट छान समजावलंय..... आहाराच महत्व असे अजून काही पॉईंट्स add करता येतील का?
उत्तर द्याहटवाधन्यवाद. आहारासंदर्भातील मार्गदर्शन आहारतज्ज्ञ देऊ शकतील. पण आहार कसा पाळायचा यावर लिखाण करायचा नक्की प्रयत्न करेन.
हटवामाहितीपूर्ण लेख. उदाहरण, स्पष्टीकरण यांचा चपखल, योग्य वापर केला आहे आआहे. सर, खूप आवडला तुमचा लेख. वाईट सवयी घालवण्यासाठी आणि चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
उत्तर द्याहटवाइतकी विस्तृत कमेंट केल्याबद्दल धन्यवाद
हटवाखूप छान लिखाण आहे. काका वर गेलास आहे. तुझे लेख असे आहेत की ते शेवटपर्यंत वाचावेसे वाटतात . आणि खूप उपयुक्त आहेत
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा