ओ. सि. डी.

मला सतत हात धुण्याची सवय लागली आहे. मला असं वाटतं की माझ्या हातावर घाण आहे. त्यात जंतू आहेत. आणि ते घालवण्यासाठी हात धुणे गरजेचेच आहे. नाहीतर मला काहीतरी होईल. असा विचार येऊन मी हात धुतो. थोडा वेळ बरे वाटते. पण नंतर काही काळाने पुन्हा हाच विचार येतो, कारण तेव्हा कुठेतरी हात इकडे तिकडे लागलेला असतो. पुन्हा हात धुतो आणि हे चक्र सुरूच राहते. त्यातून मी बाहेरच पडू शकत नाही. माझ्या कौन्सिलिंग सेंटर मध्ये नुकताच नोकरी सुरू केलेला सुनील मला त्याची समस्या सांगत होता. सुमेधाच्या ह्या समस्येला ऑबसेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर (ओ.सि. डी.) असं म्हणतात.

ओ.सि. डी. म्हणजे पछाडलेल्या, मन व्यापून टाकलेल्या विचारांमुळे सतत करावी लागणारी अनिवार्य अशा कृतीची समस्या.

 एका उदाहरणाने हे अजुन जास्ती स्पष्ट होईल. ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या दिनकर रावांना गाडी विषयी खूप प्रेम. पण त्याच वेळी ही गाडी चोरीला जाईल अशी चिंता हळूहळू त्यांच्या मनात घर करू लागली. त्यामुळे गाडी चालवून झाली की प्रत्येक दरवाजा मी नीट बंद केला आहे ना याची खात्री होण्यासाठी प्रत्येक दार ते तपासून ओढून पाहायला लागले. पुढची तपासणी झाली की पुन्हा मागचे दार तपासणे आणि मागची दारे तपासली की पुन्हा शंका येऊन पुढची दारे पुन्हा तपासायला जाणे. असं सतत दरवेळी व्हायला लागलं. आणि यामुळे गाडी बंद केल्यानंतरचा अर्धा तास ह्या तपासणीत जाऊन वाया जाऊ लागला.

तसं पहायला गेलं तर शंका आपल्या सर्वांनाच येत असते. कधीकधी आपण एखाद दोन वेळा खात्री करून सुद्धा घेतो. पण जर याचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागला किंवा अधिकाधिक वेळ आपल्या शंकेमुळे तपासण्याची कृती करण्यात जाऊ लागला आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात याचा परिणाम होऊ लागला तर ओ.सि. डी. झाल्याची शक्यता बळावते.

ओ.सि. डी. चे अनेक प्रकार आत्तापर्यंत दिसले आहेत.

धुणे, तपासणे याबद्दलची उदाहरणं आपण तर पाहिलीच. याशिवाय अति व्यवस्थितपणा, गोष्टी साठवणे इत्यादीही प्रकारच्या समस्या असणाऱ्या व्यक्ती आपल्याला समाजात कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसतात. या समस्येत शंकेचं आणि अपराधीपणाचं प्रमाण खूप जास्त असते. सतत येणाऱ्या विचारांनी शंकेचं काहूर मनात निर्माण होतं. आपली शंका चुकीची आहे हे माहिती असून सुद्धा व्यक्ती स्वतःला थांबवु शकत नाही. कारण त्याशिवाय त्या व्यक्तीचं समाधानच होत नाही. आणि अशी न थांबू शकणारी कृती घडल्यावर अपराधीपणा मनात येतो. ओ.सि. डी.वर मार्ग काढण्यासाठी सायकोथेरपिस्ट यांच्यासोबत मनोविकार तज्ञ (सायकॅट्रिस्ट) यांचीही मदत लागते. कधीकधी इतर समस्यांपेक्षा ओ.सि. डी.ला वेळ थोडासा जास्त लागत असला तरी यावर नक्कीच मात करता येते.

गेल्या काही लेखातून आपण चिंता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या विषयी जाणून घेत आहोत. शक्य तितके आपल्या बोलीभाषेत त्याबद्दलची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न असला तरी असं नेहमीच शक्य होत नाही. त्यामुळेच आजच्या चर्चेसाठी घेतलेल्या समस्येचं नाव मुद्दाम इंग्रजी तसंच ठेवलं आहे. खरं तर ओ.सि. डी. ला मराठीत मंत्रचळ असं म्हणतात. पण मंत्रचळ हा नेहमीच्या वापरातील शब्द नसल्याने बहुतेकदा पटकन लक्षात येत नाही. सामान्यतः ही समस्या ओ.सि. डी. या नावानेच प्रचलित आहे.

अजिंक्य गोडसे
सायकोथेरपीस्ट
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?