सामाजिक चिंता
‘गेली 15 वर्ष मी ज्या ठिकाणी काम करतो ते माझं ऑफिस सोडायचा मी विचार करतोय. कारण, माझ्या मागून आलेली मुलं छान पद्धतीने लोकांना काम सांगतात, कामगारांकडून काम करवून घेतात आणि मला हे अजिबात जमत नाही. लोकांसमोर उभं राहून बोलायची मला प्रचंड भीती वाटते. ते काय म्हणतील? माझ्याबद्दल चुकीचं मत तरी ते करून घेणार नाहीत ना? ते मला चुकीचे ठरवणार नाहीत ना? असे असंख्य प्रश्न लोकांसमोर मी बोलायला उभा राहिलो, लोकांशी मी बोलायला लागलो की माझ्या मनात येतात. यामुळे मी माझ्या बॉसना पण नीट उत्तर देऊ शकत नाही आणि याचा परिणाम माझं प्रमोशन पण होत नाही.’ माझ्या क्लिनिकमध्ये बंडोपंत मला त्यांच्या ऑफिसमधल्या वर्तनाबद्दल सांगत होते.
‘ऑफिसच काय घेऊन बसलात माझ्या मित्रांसमोर सुद्धा अनेकदा माझं असं होतं. बँकेत सगळ्यांसमोर चेकवरची सही सुद्धा माझी बर्याचदा चुकली आहे. लोक समोर आले की माझी भीतीने गाळण उडते.’
बंडोपंतांना होणाऱ्या या त्रासाला मानसोपचार शास्त्रात सामाजिक चिंतेची समस्या म्हणजेच सोशल एन्झायटी डिसऑर्डर असं म्हणतात. आपल्याला काही सामाजिक प्रसंगात भीती वाटते, आपण खरंच अस्वस्थ होतो, आपल्या पोटात गोळा येतो. उदा. स्टेजवर जाऊन हजार लोकांसमोर बोलणं इ. पण सामाजिक चिंतेचा त्रास असणाऱ्यांना दररोजच्या साध्या संवादांमध्ये सुद्धा चिंता, भीती, लाज यांना सामोरं जावं लागतं. याचं कारण म्हणजे अशा लोकांना ते इतरांकडून चुकीचे ठरवले जातील किंवा इतर लोक त्यांना त्यांचं काही चुकलं तर वाईट म्हणतील असं सतत वाटत असतं. त्यामुळे ते लोकांसमोर असताना तणावाखाली वावरतात. याचा परिणाम त्यांचं दैनंदिन वेळापत्रक काम आणि इतर गोष्टींवरती होतो.
CBT या मानसोपचार पद्धती म्हणजे सायकोथेरपी नुसार अशा पद्धतीचा त्रास असणाऱ्या लोकांच्या मनात सतत घोळत असणाऱ्या विचारांच्या मधील एक चूक या समस्येचं प्रमुख कारण आहे. ही वैचारिक चूक म्हणजे म्हणजेमाइंड रीडिंग म्हणजेच मन वाचणे किंवा डोके वाचणे.
खरंतर आपण समोरच्याचे मन वाचू शकतो का? नाही. पण ह्या समस्या असणारे लोक ते वाचण्याचा किंबहुना सतत वाचण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या बारीक-सारीक हालचालींचे निरीक्षण करून त्याचा चुकीचा अर्थ लावतात आणि स्वतःचा दृष्टिकोन बिघडवतात. त्यामुळे त्यांना चिंता, भीती, लाज वाटू लागते आणि ते लोकांपासून दूर पळतात. सहाजिकच एखादा व्यक्ती आपल्याशी नीट बोलत नाही, दूर दूर राहतो तेव्हा आपणही फार वेळा त्याच्याशी बोलायला जात नाही. याच मुळे इतर लोक सामाजिक चिंतेची समस्या असणार्या व्यक्तीशी फार बोलायला जात नाहीत. याचा परिणाम सामाजिक चिंता असणाऱ्या माणसाला त्याचा बिघडलेला दृष्टिकोन योग्य वाटू लागतो आणि समस्या वाढतच जाते.
CBT यावर एक उपाय सुचवते तो म्हणजे समोरच्यांच्या प्रत्येक कृतीचे आपण लावत असलेले अर्थ म्हणजे बाकी काही नसून केवळ आपलं मत आहे, ही खरी गोष्ट नाही हे स्वतःला समजावणे. याबरोबरच पूर्वग्रहदूषित विचार न करता ताज्या-कोऱ्या मनाने प्रसंगाकडे पाहणे.
चिंता,भीती-लाज जरी वाटू लागली तरी पळून न जाता प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणे. सुरुवातीला हे थोडं अवघड वाटेल पण सातत्याने आणि संयमाने जर याचा वापर केला तर लक्षात येईल की आपण उगाचच घाबरत होतो. चूक लोकांची किंवा स्वतःची नव्हती तर फक्त माझ्या चुकीच्या विचारांची होती. हा वैचारिक बदल हा CBT या सायकोथेरपीचा महत्वाचा भाग आहे. हे उपाय केल्यास नक्कीच ही सामाजिक चिंता हळूहळू कमी होईल.
To the point and informative👍
उत्तर द्याहटवाThanks Kavya
हटवा"समोरच्यांच्या प्रत्येक कृतीचे आपण लावत असलेले अर्थ म्हणजे बाकी काही नसून केवळ आपलं मत आहे, ही खरी गोष्ट नाही हे स्वतःला समजावणे." - खूप महत्वाचे
उत्तर द्याहटवाThanks great sir
उत्तर द्याहटवा