झोपेची समस्या (इन्सोमनिया)
50 वर्षांचे भीमराव सांगत होते. "लॉकडाउन झाल्यानंतर लगेचच माझ्या व्यवसायावरती परिणाम झाला. तसा फार मोठा माझा व्यवसाय नाही पण साठवलेल्या पैशांवर त्या वेळचे दिवस काढले. मुलगा अजून शिकतोय त्यामुळे त्याच्यावर ही फार भार देता येत नव्हता. साधारण दोन ते अडीच महिने मी खूप ताणात होतो. त्यानंतर पुन्हा काम सुरू झालं; व्यवसाय सुरू झाला. पैसेही मिळू लागले. पण लॉकडाऊन दरम्यान गेलेली झोप मात्र काही परत आली नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस मी नीट झोपूच शकलेलो नाही. जर झोप लागलीच तरी पुन्हा लगेच जाग येते. रात्री झोप न झाल्याने सकाळी मी कामावर जाऊ शकेन का? व्यवस्थित काम करू शकेन का? मला चक्कर तर नाहीना येणार? या आणि अशा अनेक शंका मनात येतात. यामुळे, माझा कामावर जाण्याचा आत्मविश्वासच निघून गेलेला आहे. याचा परिणाम आता माझ्या व्यवसायावर होताना मला दिसू लागला आहे. झोप तर लागत नाहीये; व्यवसाय नीट करता येत नाहीये; यामुळे मी अगदीच हतबल होऊन गेलो आहे. काय करावं काहीच कळेनासं झालेलं आहे. जस जशी रात्र जवळ येते तस तशी आता मला माझ्या झोपेचं काय होणार याची भयंकर चिंता वाटू लागते. मी काय करू? मला काहीच सुचत नाहीये."
भीमरावांच्या या त्रासाचं नाव आहे झोपेची समस्या, झोपेचा डिसऑर्डर किंवा इनसोमनिया. हा इनसोमनिया आपल्या झोपेचं गणित तर बिघडतोच पण त्याबरोबर बहुतेकदा चिंता नैराश्य यांनाही सोबत घेऊन येतो.
इनसोमनियाची प्रमुख लक्षणे म्हणजे पुरेशा प्रमाणात आणि पुरेशा गुणवत्तेची झोप न लागणं, झोप लवकर न लागणं, खूप लवकर जाग येणं ही आहेत. ही किंवा अशी लक्षणं तुम्हाला जर आठवड्यातून किमान तीन वेळा सलग महिनाभर दिसत असतील तर यावर सायकोथेरपीस्ट किंवा कौंसेलर्स यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.
हा मानसिक रोग प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये आढळतो. खूप ताण आल्यानं हा रोग होऊ शकतो. या रोगात मगाशी भीमरावांनी सांगितल्याप्रमाणं जसजशी झोपेची वेळ जवळ येऊ लागते तसं चिंतेचे प्रमाण वाढत जातं. दिवसभर डोक्यात सतत झोपेविषयी विचार घोळत राहतात. हा इनसोमनिया कधीकधी नैराश्याचं लक्षणं ही असतो. या वरती उपचार घेताना सायकोथेरपीसोबत सायकॅट्रिस्ट म्हणजेच मनोविकार तज्ञ यांचीही मदत घ्यावी लागते.आपण या इनसोमनियाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून एक खूप चांगली गोष्ट सायकोथेरपी सुचवते याचं नाव आहे sleep hygiene, म्हणजेच झोप येण्यासाठी करण्याचे किंवा पाळण्याचे नियम. सोप्या भाषेत आपण त्याला झोपेचे नियम असे म्हणू. हे नियम आपण पुढील लेखात पाहूयात.
धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा