शारीरिक चिंता
माझ्या क्लिनिक मध्ये सुमेध माझ्याशी बोलत होता. वजन अगदीच कमी झालेलं दिसत होतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील आलेली होती. त्याच्या बोलण्यात निराशा दिसत होती. ‘माझ्या छातीत थोडसं दुखत होतं. मी ईसीजी काढला. ऍन्जिओग्राफी केली. सगळी उपलब्ध साधनं वापरून वेगवेगळ्या टेस्ट केल्या. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला काहीच झालेलं नाही. मी सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून दुसऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी अजून काही वेगळ्या टेस्ट सांगितल्या. त्याही केल्या. पण रिपोर्टमध्ये तरीही काहीच निघालं नाही. पण दुखणं तर होतचं. त्यामुळे मी पुन्हा नवीन डॉक्टरांना भेटलो. गेल्या वर्षभरात सहा-सात डॉक्टर झाले. पण सगळ्यांकडे रिपोर्ट नॉर्मल. शरीरात काहीच दोष नाही असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. मी काय करू? मला कळेनासं झालंय. कोणत्याच डॉक्टरांकडून समाधान झालं नाही म्हणून शेवटचा पर्याय मी इंटरनेट-गुगल वर याचा शोध घेतला. त्यात आलेल्या वेबसाइटनं असं सांगितलं की छातीत दुखत असेल तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि यामुळे माणूस मरुही शकतो. हे वाचल्यानंतर तर मला वाटू लागलं की आता मी मारणार. मी मेलो तर माझ्या कुटुंबीयांचा कसं होणार? मला मरायचं नाहीये. आणि तेव्हापासून मला झोप लागत नाही, जेवण जात नाही,भविष्यात अंधार दिसतोय, डॉक्टरांकडून समाधान पूर्ण उत्तर मिळत नाही, ते मला काही उपायही सुचवत नाहीत आणि गुगल वरची वेबसाईट मात्र मी मरेन असं सांगते. या सगळ्याचा परिणाम मला अगदीच असहाय्य वाटू लागलंय.’
आपल्या सर्वांना लक्षात आलं असेलच की सुमेधच्या ह्या लक्षणांना शारीरिक चिंतेची समस्या असं म्हणतात.
या समस्येवरचा पहिला उपाय म्हणजे आपल्याला होत असलेल्या शारीरिक त्रासाकडे तो जितका आहे तितकाच पाहणं म्हणजेच उगाच त्याचा बाऊ न करता मनात येणाऱ्या शंका म्हणजे केवळ शंकाच आहेत खरी गोष्ट नाही हे स्वतःला सांगणं.
एक महत्त्वाचं पथ्य या समस्येत पाळावं लागतं ते म्हणजे विश्वासाचं. गुगल, व्हाट्सएप, वेबसाईट, मित्र, नातेवाईक यापेक्षा स्वतःच्या डॉक्टरांच्यावर, येणाऱ्या रिपोर्टवर विश्वास ठेवणं. कारण डॉक्टर तुम्हाला पाहून तुमचे रिपोर्ट पाहून उपाय सुचवतात. वेबसाईट, गुगल सर्वांना लागू होणार सर्व काही सांगतं आणि बाकी सगळे ऐकीव माहितीच जास्ती सांगतात. त्यामुळे त्या त्या विषयाच्या तज्ञाकडून मदत मिळवणं फायद्याचं. वेबसाईट, गुगल, व्हाट्सएप कडून केवळ माहिती मिळते मदत किंवा ज्ञान नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा