विशिष्ट भय (फोबिया)
तीस वर्षाची अरुणा आपल्या नवऱ्यासोबत माझ्या कौंसेलिंग सेंटर मध्ये येऊन बसली होती. बाहुल्यांची प्रचंड भीती वाटते अशी तिची तक्रार होती. प्रत्यक्षात बाहुली दिसली की तिला भीती वाटायचीच. पण जर टीव्हीमध्ये बाहुली दिसली तरी तिला त्रास व्हायचा. ती परिस्थिती अरुणा सहनच करू शकत नव्हती. त्या जागेवरून ती पळूनच जायची. तिचा चेहरा पांढरा फटक पडायचा. बाहुली किंवा बाहुलीचा चित्राची सुद्धा अरुणाला प्रचंड भीती वाटे.
आपल्याला आजूबाजूला आपण असेल अनेक लोक पाहत असतो ज्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. काही जणांना उंचीचा त्रास होतो तर काहींना कुत्र्यांची भीती वाटते. काही लोक अंधाराला घाबरतात तर काही लोक सापांना, पालीला इ. माझ्या सेंटर असाही एक मुलगा आला होता ज्याला मासे खायची फार आवड होती. मेलेल्या माशांची अजिबात भीती वाटत नसे पण त्याला फिश टॅंक मधले मासे पाहून भीती वाटायची.अशा विशिष्ट गोष्टींच्या वाटणाऱ्या भीतीला फोबिया असं म्हणतात.
फोबिया किंवा भय निर्माण करणारी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करणे; न टाळता आल्यास, त्या ठिकाणाहून शक्य तितक्या लवकर पळून जाण्याचा प्रयत्न करणे हे फोबियाचं प्रमुख लक्षण आहे.
अशावेळी फोबियाची समस्या असणाऱ्या व्यक्तीस अनेक शारीरिक लक्षणे सुद्धा जाणवतात. श्वास फुलणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, घशाला कोरड पडणे इ. बहुतेकदा हे फोबिया वयाच्या चौथ्या ते आठव्या वर्षात तयार होतात. सध्या साधारण २०० हून अधिक फोबिया मानसशास्त्रज्ञांना मिळाले आहेत.
काही मानसशास्त्रज्ञांच्यानुसार बऱ्याचदा फोबिया होण्याचं कारण हे पूर्वी घडलेल्या एखाद्या भीतीदायक प्रसंगात दडलेलं असतं. आपला मेंदू अशा फोबिया-भय वाटणाऱ्या गोष्टी समोर असताना खूप वेगळ्या प्रकारे काम करतो. आपला मेंदूत आठवणींचे विविध कप्पे असतात. या विविध कप्प्यांमधून वेगवेगळ्या आठवणी मेंदू नेहमी साठवत असतो. एखाद्या तणावपूर्ण घटनेदरम्यान मेंदू त्या घडलेल्या घटनेची आठवण साठवून ठेवतो आणि पुन्हा साधारण त्या तणावपूर्ण घटनेने सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जिथे असेल तेथे मेंदू पूर्वीच्या आठवणींचा आधार घेऊन जणू काही तणावपूर्ण घटनाच समोर आली आहे असं आपल्याला भासवतो आणि आपल्याला भीती वाटू लागते. याची उदाहरणं म्हणजे अंधाराची वाटणारी भीती किंवा लिफ्टची वाटणारी भीती.
काही फोबिया हे मोठ्यांच्या अनुकरणातून तयार होतात. उदा. पालीची, झुरळाची, उंदराची, कुत्र्याची वाटणारी भीती. तर काही फोबिया हे अनुवांशिकतेने संरक्षणार्थ म्हणून माणसात पूर्वजांच्याकडून आलेले आहेत. उदा. जंगली श्वापदांची, सापाची भीती. जर हे अनुवंशिकतेने आलेले फोबिया जर माणसांमध्ये नसते तर कदाचित न घाबरल्याने जंगली श्वापदांपासून आदिमानवाचे संरक्षण झाले नसते आणि कदाचित मानवी वंश सुद्धा त्यामुळे खुंटला असता.
याचाच अर्थ दरवेळी मी निडरच राहिलं पाहिजे अशी काही आवशकता नाही. गरजेच्या वेळी घाबरणं हे देखील महत्वाचं आहे.
फोबियावर नियंत्रण मिळवायचं असेल, फोबिया कमी करायचा असेल तर फोबिया ची समस्या असणाऱ्यांनी सहनशीलता वाढवून अशा प्रसंगांना आपण सामोरे जाऊ शकतो तेवढी आपली शारीरिक आणि मानसिक ताकद आहे हे स्वतःला दाखवलं पाहिजे. यामुळे जुन्या पलायनाच्या आठवणीवर मात देण्यासाठी सहनशीलतेच्या आठवणी सुद्धा तयार होतील. बहुतेकदा आपण अशावेळी प्रसंग खूपच बिकट झाला आहे असं स्वतःला सांगतो. तेव्हा खरंच प्रसंग किती बिकट झाला आहे हे ही पडताळून पाहिलं पाहिजे. कौन्सिलिंग सेंटर मध्ये अनेक जण फोबिया कमी करण्यासाठी येतात. पण शक्यतो अशाच फोबिया वर आपण वेळ कष्ट खर्च करावेत ज्यांच्यामुळं आपलं वेळेचं, कामाचं, पैशाचं नुकसान होऊ शकतं किंवा होतं आहे.
आकाश पाळण्याच्या फोबियावर काम केलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही.
सुंदर माहिती आहे
उत्तर द्याहटवा