आपण त्यांच्या समान व्हावे
(CBT या मानसोपचार पद्धतीचे जनक डॉ. ऍरॉन बेक यांचं दि. ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या १००व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या कार्याची माहिती देणारा हा लेख.)
1960च्या सुमारास मानसशास्त्राच्या जगतावर सिग्मंड फ्रॉईड या विख्यात मानसशास्त्रज्ञाचं राज्य होतं. फ्रॉइड यांनी स्वतः एक मानसोपचार पद्धतीचा म्हणजेच थेरपीचा शोध लावला होता. सायकोऍनॅलिसिस हे त्या थेरपीचं नांव. जगातले बहुतेक सर्व प्रमुख मानसशास्त्रज्ञ या सायकोऍनॅलिसिसचाच वापर करत होते. सायकोऍनॅलिसिसचा वापर करणाऱ्यांना सायकोऍनॅलिस्ट म्हंटलं जायचं. त्याच काळात पेनिसेल्व्हियाच्या विद्यापीठात एक प्रोफेसर मानसोपचार शिकवत होते. ते प्रोफेसर सुद्धा सायकोऍनॅलिस्ट होते. पण या सायकोऍनॅलिसिसचा म्हणावा तितका उपयोग क्लायंटला होत नाहीये असं त्यांना वाटत होतं. कारण या सायकोऍनॅलिसिस पद्धतीच्या काही मर्यादा होत्या. एकतर किती दिवस हि थेरपी वापरावी याची ठोस अशी कोणतीही वेळ देता येत नव्हती. आणि नेमकी सायकोऍनॅलिसिसची पद्धत काय आहे याबाबत पण स्पष्टता नव्हती. याचा परिणाम मानसिक डिसऑर्डर दुरुस्त व्हायला खूप वेळ लागायचा. कधी कधी तो दुरुस्त व्हायचाच नाही. सततचं सायकोऍनॅलिसिस वापरावं लागायचं.
ही वेळ कशी कमी करता येईल याबद्दल हे प्रोफेसर बराच विचार करायचे. त्यांना डिप्रेशन या मानसिक डिसऑर्डर बद्दल असं वाटत होतं कि डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांचे स्वतःबद्दलचे, जगाबद्दलचे आणि भविष्याबद्दलचे असणारे अकार्यक्षम विचार त्यांचं डिप्रेशन वाढवण्यासाठी कारणीभूत असू शकतात. म्हणून या प्रोफेसरांनी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांच्याकडं जे डिप्रेशनचे क्लायंट येत होते त्यापैकी काही क्लायंटस् ना त्यांच्या विचारात बदल करायला सुचवायचं आणि याचा त्यांच्या डिप्रेशनवर काय परिणाम होतो हे तपासायचं हा तो प्रयोग होता. असे विचारांचे बदल केल्यावर त्याचे आश्चर्यकारक परिणाम समोर आले. या प्रयोगाअंती असं आढळून आलं कि अशा प्रकारे अकार्यक्षम विचार बदलले कि क्लायंटच्या डिप्रेशनच्या लक्षणात खूपच सुधारणा दिसत होती. यातून या प्रोफेसरांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती कि कोणताही प्रसंग आपल्याला भावना देत नाही तर आपण त्या प्रसंगाचा कसा अर्थ काढतो, त्या प्रसंगात काय विचार करतो तो विचारच भावनांवर सर्वात जास्त प्रभाव टाकत असतो.
आणि हीच मानसशास्त्राच्या युगात एका नव्या, जगावर प्रभाव टाकण्याऱ्या, मानसिक डिसऑर्डर्सवर लवकर प्रभावी ठरेल अशा सायकोथेरपीच्या जन्माची नांदी होती. या सायकोथेरपीचं नांव आहे कॉग्नीटीव्ह थेरपी आणि त्या प्रोफेसरांचं नांव होतं डॉ. ऍरॉन टेमकीन बेक.
डॉ. ऍरॉन बेक यांचा जन्म अमेरिकेतील रोह्ड आयलंड या राज्याची राजधानी असणाऱ्या प्रोव्हिडन्स शहरात दि. १८ जुलै १९२१ रोजी झाला. ऍरॉन बेक यांनी वयाच्या चाळीशीत कॉग्नीटीव्ह थेरपी या प्रसिद्ध सायकोथेरपीला जन्म दिला. २००९ साली झालेल्या एका सर्वेक्षणात ऍरॉन बेक हे जगातील दुसरे प्रभावशाली सायकोथेरपीस्ट ठरले होते. सध्या ह्या कॉग्नीटीव्ह थेरपीला जग कॉग्नीटीव्ह बिहेविअर थेरपी (CBT) या नावानं ओळखतं. ऍरॉन बेक यांचं वैशिट्य असं कि प्रस्थापित असणारं सायकोऍनॅलिसिस त्यांनी शिरसावंद्य मानलं नाही. त्यांनी या प्रस्थापित थेरपीला प्रश्न विचारण्याचं धैर्य ठेवलं. नुसतेच प्रश्न विचारले नाहीत तर त्यावरची उत्तरंही त्यांनी शोधली. फुकाची बंडखोरी न करता, योग्य मार्गाने, चिंतनातून स्वतःच उत्तर स्वतःच शोधलं. आणि यातून जगाला CBT ची देणगी दिली.
बेक यांनी वयाची अनेक वर्ष डिप्रेशनवरील आणि चिंतेच्या मानसिक डिसऑर्डर वरील संशोधनासाठी दिली. यामुळं, CBT सोबतच बेक यांनी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या शोधल्या. डिप्रेशन आणि चिंतेवरील त्यांच्या चाचण्या जगात सर्वत्र वापरल्या जातात.
बेक यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भाषेचा जबरदस्त अभ्यास होता. आणि याचा प्रत्यय पावलोपावली CBTचा अभ्यास करताना मी घेतला आहे, माझ्या सुपरवायझर्सनी तो दाखवून दिला आहे. त्यांनी CBTमधील संकल्पनांना अत्यंत सोपी आणि सटीक नांवं दिली. यामुळं फक्त नांवं वाचली कि लगेच संकल्पनेच्या बाबतीत नेमकं काय असणार आहे त्याचा सारांश म्हणजे आजच्या भाषेत gist कळतो. म्हणूनच मानसशास्त्राचा अभ्यास नसणाऱ्या सर्वांना सुद्धा CBT लवकर कळते.
REBT जनक अल्बर्ट एलिस यांनी मानसशास्त्रातील ह्या वैचारिक क्रांतीची सुरुवात केली. त्यांचं कार्य पुढं नेण्याचं काम, त्याला वेगळा दृष्टिकोन देण्याचं काम बेक यांनी केलं.
सध्या CBT ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी सायकोथेरपी, मानसोपचार पद्धती आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात CBT चा वापर केला जातो. हजारोंच्या प्रमाणात संशोधनं या थेरपीमध्ये सुरु आहेत. केवळ मानसिक डिसऑर्डर्स कमी होण्यासाठी CBT ची मदत होत आहे असं अजिबात नाही, तर त्यासोबत ताण व्यवस्थापन म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट आणि कौशल्य विकासामध्ये सुद्धा CBT सर्वांना मदत करत आहे. म्हणूनच, CBT चा शोध मानवतेसाठी मैलाचा दगड ठरलं आहे. याच कारणामुळं, मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या मनातलं, ऍरॉन बेक यांचं स्थान, ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे.
आपणही बेक यांच्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा आंधळा विरोध किंवा समर्थन न करता विवेकाच्या कसोटीवर खरे ठरणारे घेऊन, जे पटत नाही त्याचा फक्त विरोध न करता, त्यामध्ये अधिकचे काम, संशोधन करावे. केवळ अंध अनुकरण न करता आपण त्यांच्या समान वागण्याचा प्रयत्न करण्याचा बोध घ्यावा हीच ऍरॉन बेक यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा