नातं म्हणजे काय?


कोल्हापूर जिल्ह्यातील नेहमीची एक सकाळ...

पुण्याहून कोल्हापूरमधल्या एका गावात नुकतीचं लग्न होऊन आलेल्या सखूला तिचा नवरा म्हणजेच रामनाथ म्हणतो... सखू जरा चावीला पाणी आलंय का ते पाहतेस का?
सखूला जरा गम्मत वाटली. चावी तर कुलूप उघडायला वापरतात. तिच्यातून पाणी कसं येईल? पण तरीही तिनं जाऊन एकदा कुलपाची चावी तपासली. पण तिच्यातून पाणी येतंय असं काही तिला दिसलं नाही...
तिला काहीच कळेना. ती परत रामनाथकडं गेली. त्याला म्हणाली कि चावीतर ठणठणीत आहे. तीला काही पाणी आलेलं नाही. रामनाथ म्हणाला ठीक आहे. पण मनात म्हणाला कि रोज तर यावेळीच चावीला पाणी येतं आज काय झालं?
काहीतरी अडचण झाली असेल म्हणून तो बाहेर त्याच्या आलेल्या मित्राला भेटायला गेला तर त्याला दिसलं कि शेजारी असणाऱ्या नळाला तर धो धो पाणी आहे. त्याला काहीच कळेना. त्याला वाटलं कि सखूला काही काम करायचं नाहीये.
त्याला थोडा तिचा राग आला. पण तिला काही न बोलता त्यानं मित्राशी गप्पा मारल्या आणि नंतर आत मध्ये गेला. सखूशी जरा हटकूनचं वागायला लागला. सखूला वाटलं कि आज काहीतरी झालंय. सकाळपासून आमचे हे काहीपण बोलत आहेत आणि आता कसं पण वागत आहेत. तिची सुद्धा यामुळं चिडचिड व्हायला लागली. आणि हळू-हळू दोघांचे आवाज वाढत गेले.
सखूची सासू न बोलता सगळं पाहत होती. पण आता कदाचित यांच्यात वाद होईल असं दिसल्यावर मात्र तिनं दोघांना जवळ बोलवलं आणि विचारलं कि काय झालंय नेमकं...?
रामनाथनं सांगितलं कि एकतर आज ही माझ्याशी खोटं बोलली की चावीला पाणीचं आलेलं नाहीये...
यावर सखू म्हणाली कि यांना आज काहीतरी झालंय. चावीला कधी पाणी येतं का? चावी कुलूप उघडायला वापरतात.
पहिल्यांदा सासूला आणि नंतर रामनाथ दोघांना झालेला घोळ लक्षात आला. नेमकं काय झालंय हे दोघांच्याही लक्षात आलं.
रामनाथ म्हणाला कि माझी चूक झाली. मला माहित नव्हतं सखू कि तुला कोल्हापूर जिल्ह्यात नळाला चावी असं म्हणतात हे माहित नाही. सखूला सुद्धा आता सगळं लक्षात आलं आणि ती सुद्धा हसायला लागली.
सासूबाई यावर म्हणाल्या कि अरे बाळांनो नातं हे असंचं असतं. आपण नेहमी एकमेकांना आपल्याबद्दल, आपल्या स्वभावाबद्दल काहीतरी सांगत, शिकवत असतो. जर आपण समोरचा काय म्हणतोय हे शिकलो तर आपले गैरसमज दूर होतात. जर आपण शिकलोच नाही तर मात्र आपलं नातं टिकत नाही.
आपल्या नवऱ्याला वेळ पाळलेली आवडते हे जर बायकोच्या लक्षात आलं, बायको हे शिकली तर ती लवकर आवरेल आणि आपल्या बायकोला आपण आपल्या गोष्टी जागेवर ठेवलेल्या आवडतात हे नवरा शिकला तर तोही जागेवर सगळं ठेवायला लागेल.
नातं म्हणजे न संपणारी एक शिक्षण प्रक्रियाच आहे. फक्त नवरा बायकोच्याच नात्याबद्दल नाही तर सर्व नात्यांना ही व्याख्या लागू होते. अगदी मित्रांपासून, गुरु-शिष्यापर्यंत सर्व नात्यांना...
आपल्या मित्राला काय आवडतं आणि काय केलेलं आवडत नाही हे जर आपण शिकलोच नाही तर आपण त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करत राहिलो तर आपली मैत्री टिकणारच नाही.
अॅरोन बेक नावाच्या CBT या मानसोपचार पद्धतीचा शोध लावणाऱ्या सायकोथेरपिस्टनं ही व्याख्या सांगितलेली आहे. तुम्ही नेहमी स्वतःबद्दल दुसऱ्यांना शिकवत असता आणि दुसऱ्यांबद्दल स्वतः शिकत असता. जर हे शिक्षण तुम्ही घेत राहिलात तर हे नातं फुलायला मदत होते.
आता फार वेळ घालवू नका आणि एकमेकांवरचा रुसवा घालवून आपापल्या कामाला लागा असं सासूबाई म्हणाल्या. एक वेगळंच समाधान तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर होतं.
अजिंक्य गोडसे
सायकोथेरपीस्ट
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?