हम होंगे कामयाब
प्रसंग 1 - 24 मार्च 2021, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. संपूर्ण जग हळूहळू कोरोनाच्या विळख्यात अडकत चाललं होतं. परिस्थिती तशी गंभीरच होती. चीन मधून आलेल्या या विषाणूचा प्रादुर्भाव हा प्रचंडचं होता. याच सुमारास विवेकला अकौंटसच्या एका कंपनीत नवी नोकरी लागली होती. कोरोनामुळं झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम होऊन, कंपनीनं बरेचसे कर्मचारी कामावरून कमी केले. साहजिकच, जे नवीन नोकरीस लागले होते, त्यांना याचा फटका जास्त बसला. विवेकला ही त्याची नोकरी गमवावी लागली. याबाबद्दल विवेकला अत्यंत मानसिक त्रास झाला. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. पुन्हा एकदा सगळं सुरळीत झाल्यावर त्याच कंपनीनं विवेकला संपर्क साधला पण विवेकनं त्या कंपनीस नकार कळवला. परत एकदा निराशा हाती लागेल अशी चिंता त्याला जाणवत होती. हा नकार पचवणं अवघड जाईल असा विचार करून त्यानं ती कंपनी जॉईन केली नाही. आत्ताही त्याला काही ऑफर्स येतात पण नकाराच्या चिंतेनं तो त्या स्वीकारत नाही. मुलाखतीला सुद्धा जात नाही.
प्रसंग 2 - पुन्हा एकदा 24 मार्च 2021, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. याच सुमारास निशाला एका सॉफ्टवेअर कंपनीत नवी नोकरी लागली होती. कोरोनामुळं झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम होऊन, निशालाही तीची नोकरी गमवावी लागली. पण, निशानं घरी येऊन या परिस्थितीचा विचार केला. आपलं ध्येय काय आहे याकडं तिनं स्वतःचं लक्ष वेधलं. आपलं ध्येय काम करणं आहे की फक्त आणि फक्त हीच नोकरी, हेच सॉफ्टवेअर काम करणं आहे? हा तिनं स्वतःला प्रश्न विचारला. याचं उत्तर तिच्या मनानं दिलंच. तिचं ध्येय काम करणं हे आहे. फक्त सॉफ्टवेअरचंच काम करणं या अट्टहासानं ती कदाचित या कोरोना काळात स्वतःचं नुकसानच करून घेईल. तिला हेही लक्षात आलं की जगात तिच्या सारख्या परिस्थितीला सर्वच ठिकाणी अनेकजण सामोरे जातआहेत. ती बाहेर पडली तर तिला बाहेर कोणतंही काम मिळणं तसं अवघडंच आहे. मग काय करता येईल याचा विचार करून तिनं आत्ता सर्व लोकांना कशाची सर्वात जास्त गरज आहे हे शोधलं. त्यातून तिनं घरून भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी योग्य जाहिरात करून, खात्रीशीर माल विक्री ती करू लागली. साहजिकच त्यावेळी अशाप्रकारे भाजी व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्याचा तिला फायदा झाला आणि तिनं चांगले पैसे कमावले. तिचा आत्मविश्वास दुणावला. जर विवेकसारखी तीही या परिस्थिती समोर हतबल झाली असती तर कदाचित तिला ह्या समस्येवर मार्ग शोधता आला नसता.
म्हणजे परिस्थितीवर मार्ग काढायचा असेल तर आपण परिस्थिती समोर हतबल होणं टाळलं पाहिजे.
पण हे करणार कसं? सगळेजण हतबल होऊ नका हे सांगतात पण ते करायचं कसं?
याचं उत्तर मानसशास्त्र देतं. हे उत्तर शोधण्यासाठी आपण वरच्याच दोन्ही उदाहरणांची मदत घेऊयात. विवेक आणि निशा या दोहोंसमोरची परिस्थिती समानच होती. पण या दोघांनी त्याला प्रतिसाद मात्र वेगवेगळा दिला. याचं काय कारण असेल? तर याचं उत्तर आहे त्या दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. त्या दोघांचे विचार वेगवेगळे होते.
म्हणजे आपल्याला जर परिस्थितीसमोर हतबल व्हायचं नसेल तर आपण आपल्या विचारांकडं लक्ष द्यायला पाहिजे.
आपले विचार योग्य असतील तर आपला प्रतिसादही योग्य असेल. विचार जर अयोग्य असतील तर काय होतं?
आपण परिस्थितीमध्ये तयार झालेल्या समस्येबद्दल आणखी एक समस्या तयार करतो.
म्हणजे समस्येवर समस्या अशी दुहेरी लढाई आपल्याला लढावी लागते. विवेकसोबत असंच झालं. नोकरी जाणं ही त्याच्यासमोरची समस्या होती. पण त्याबद्दल अयोग्य विचार ठेवल्यानं आत्मविश्वासाची वेगळी समस्या त्याच्यासमोर उभी ठाकली. नोकरीच्या समस्येवर आत्मविश्वासाची समस्या अशी दुहेरी लढाई त्याला करावी लागली. जर विवेकनं योग्य विचार ठेवले असते तर ही आत्मविश्वासाची समस्या तयारच झाली नसती. परिणामी, त्याला फक्त नोकरीच्या समस्येकडंच लक्ष द्यावं लागलं असतं.
आपल्यापैकी काहींना अशाप्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं असेलचं. पण मूळ प्रश्न आहे या अयोग्य विचारांना दूर कसं ठेवायचं? योग्य विचार कसा करायचा? यासाठी पुन्हा एकदा आपण विवेकच्या उदाहरणाची मदत घेऊया. विवेकचे विचार काय असतील? कदाचित त्याच्या समोरचा विचार हा असू शकेल की सगळंच संपलं. हा सगळंच संपलं हा विचार योग्य आहे की अयोग्य हे आपण तपासून पाहुयात, त्या विचाराला काही प्रश्न विचारुयात. खरोखर सगळंच संपलं होतं का? नाही. जोपर्यंत विवेककडं नीट हात-पाय आहेत, उत्तम विचार करू शकणारी क्षमता असणारं डोकं आहे तोपर्यंत सगळंच संपू शकत का? नाही. असं असतं तर,
अणुस्फोटातून जपान उभाच राहू शकला नसता, सिंधी समाज फाळणी नंतर संपून गेला असता. पण असं काहीच झालं नाही.
कारण जोपर्यंत आपली पगडी सलामत आहे तोपर्यंत आपण नक्की हातपाय मारू शकतो. कदाचित आणखी काहीवेळा प्रयत्न केल्यावर पुन्हा एकदा अपयश येईल. पण अपयश म्हणजे अंत नाही. लढाई हरू शकतो, पण युद्ध नाही. आपण यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच जास्ती असते पण ती तेव्हाच जास्ती असते जेव्हा तुम्ही प्रयत्न करता. आणि योग्य दिशेने, आपल्या ताकदी आणि कमजोरी ध्यानात घेऊन, ताकदीचा, गुणांचा उपयोग करून, कमजोरी आणि अवगुणांवर मार्ग काढून तुम्ही यश मिळवण्याची शक्यता नेहमीच वाढवू शकता. आपण नक्की कामयाब होऊ शकतो फक्त योग्य आणि सतत असणाऱ्या प्रयत्नांची, आपल्या विचाराकडं डोळसपणे पाहण्याची त्याला जोड हवी.
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाVery well written
उत्तर द्याहटवाThank you Sor
हटवाNicely explained
उत्तर द्याहटवाThanks
हटवाVery true
उत्तर द्याहटवाThanks
हटवाखरं आहे. योग्य विचार, perspective किती महत्वाचे आहेत!
उत्तर द्याहटवाYes!
हटवा