पोस्ट्स

को जागर्ति

इमेज
एकदा एका जंगलात एका सिंहिणीनं पिलाला जन्म दिला आणि जन्म देता-देताच ती सिंहीण मरण पावली. ते सिंहाचं पिल्लू अनाथ झालं. फिरत फिरत ते एका मेंढ्यांच्या कळपात आलं. त्या मेंढ्यांनी त्या सिंहाच्या पिल्लाचा सांभाळ करायचं ठरवलं. ते पिल्लू मेंढ्यांसोबतच वाढू लागलं. त्यांच्यासारखं गवत खायला शिकलं, मोठा आवाज झाला की घाबरून पळायलाही शिकलं. एकदा त्या मेंढ्यांच्या कळपावर एका मोठ्या सिंहानं आक्रमण केलं. त्या सिंहाला त्या मेंढ्यांच्या कळपात हा सिंहाचा छावा दिसला. या मोठ्या सिंहाला आश्चर्य वाटलं. हा इथं कसा? हे मेंढ्यांप्रमाणे त्याचंही वागणं का असावं? त्याची उत्सुकता जागृत झाली. त्या मोठ्या सिंहानं त्या बछड्याला पकडलं. त्याला घेऊन तो सिंह एका तलावापाशी आला. त्या छोट्या सिंहाला त्यानं तलावात पाहायला सांगितलं. सिंहाचं आणि आपलं प्रतिबिंब नीट न्याहाळल्यावर त्या छाव्याला जाणीव झाली. जो स्वतःला इतके दिवस मेंढी आहे असं मानत होता तो स्वतःच सिंह होता. त्या जंगलाचा अनभिषिक्त राजा होता... आपण बहुतेक सर्वांनी ही गोष्ट ऐकली, वाचली असेल. स्व-जाणीव, सेल्फ अवेअरनेस नसल्यावर आपण सिंहाची मेंढी कसे होतो हे या गोष्टीतून लगे...

न धरी शस्त्र करी

इमेज
मित्रांनो, आज खंडेनवमी. आज आपण आपल्या अवजारांची पूजा करतो, यंत्रांची पूजा करतो, शस्त्रांची पूजा करतो. लहानपणापासून हा संस्कार आपल्याला मिळाला आहे. या शस्त्र-पूजनात मी अनेक आयुधांची पूजा करताना पहात आलोय. ही आयुधं पाहत असताना अनेकदा या आयुधांसोबत आणखी एक गोष्ट असली पाहिजे असं मला नेहमी वाटत आलंय. ती गोष्ट काय आहे हे तुम्हाला या प्रसंगावरून लक्षात येईलच. महाभारतातल्या शेवटच्या युद्धापूर्वीचा प्रसंग. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही कृष्णाला भेटायला द्वारकेला आले होते. दोघांनाही कृष्णाकडून युद्धामध्ये मदतीची अपेक्षा होती. कृष्णाने दोघांसमोर दोन पर्याय ठेवले. एका बाजूला होती कृष्णाची यादवांची नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला होता फक्त कृष्ण. तो ही निःशस्त्र. दुर्योधनापेक्षा वयानं लहान असल्यानं अर्जुनाला यातून निवड करण्याची पहिली संधी मिळली. अर्जुनानं या दोन्ही पर्यायातून निःशस्त्र कृष्णाची निवड केली. अर्जुनाच्या या निर्णयाचा दुर्योधनाला फारच आनंद झाला. कारण त्याला कृष्णाची सेनाच पाहिजे होती. अर्जुनाच्या निर्णयानं त्याचं काम सोपं झालं असं दुर्योधनाला वाटलं. पण पुढील इतिहास आपण सर्वजण जाणतोच. कृष्ण...

गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा

इमेज
आज गणेश चतुर्थी. सर्व कला आणि विद्यांचा दाता श्री गणेशाचं आजच्या दिवशी आपल्या घरी आगमन होतं. सकल कला आणि विद्या देणारा हा गणेश गणाधिश सुद्धा आहे. गणाधिश, गणपती याचा सोप्या भाषेत अर्थ आहे लीडर. जो लीड, नेतृत्व करतो असा तो गणपती, गणाधिश. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील लीडर बनण्याचा प्रयत्न करणं हा या दिवसाचा खरा अर्थ असावा असं मला वाटतं. चांगला लीडर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? याचं उत्तरही गणेशानंच आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला लीडर व्हायचं असेल तर आपल्याला एखादी नवीन कला, विद्या म्हणजेच कौशल्य शिकावं लागेल किंवा असणारं कौशल्य अजून उत्तम बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील हे खरं गणेश स्तवन आहे. लीडर बनण्यासाठी कोणतं कौशल्य आत्मसात करावं लागेल किंवा उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील? याचं उत्तर आहे life skills म्हणजेच जीवन कौशल्य. WHO नं 10 life skills सांगितले आहेत जी अंगी बाणवून आपण आपलं आयुष्य आपलं जीवन अधिक समाधानाने जगू शकू. एखादा चांगला लीडर व्हायचं असेल तर पहिल्या टप्प्यात हेच 10 life skills आपल्याला मदत करतील. हे 10 life skills कोणते? 1.संभाषण कौशल्...

नातं म्हणजे काय?

इमेज
कोल्हापूर जिल्ह्यातील नेहमीची एक सकाळ... पुण्याहून कोल्हापूरमधल्या एका गावात नुकतीचं लग्न होऊन आलेल्या सखूला तिचा नवरा म्हणजेच रामनाथ म्हणतो... सखू जरा चावीला पाणी आलंय का ते पाहतेस का? सखूला जरा गम्मत वाटली. चावी तर कुलूप उघडायला वापरतात. तिच्यातून पाणी कसं येईल? पण तरीही तिनं जाऊन एकदा कुलपाची चावी तपासली. पण तिच्यातून पाणी येतंय असं काही तिला दिसलं नाही... तिला काहीच कळेना. ती परत रामनाथकडं गेली. त्याला म्हणाली कि चावीतर ठणठणीत आहे. तीला काही पाणी आलेलं नाही. रामनाथ म्हणाला ठीक आहे. पण मनात म्हणाला कि रोज तर यावेळीच चावीला पाणी येतं आज काय झालं? काहीतरी अडचण झाली असेल म्हणून तो बाहेर त्याच्या आलेल्या मित्राला भेटायला गेला तर त्याला दिसलं कि शेजारी असणाऱ्या नळाला तर धो धो पाणी आहे. त्याला काहीच कळेना. त्याला वाटलं कि सखूला काही काम करायचं नाहीये. त्याला थोडा तिचा राग आला. पण तिला काही न बोलता त्यानं मित्राशी गप्पा मारल्या आणि नंतर आत मध्ये गेला. सखूशी जरा हटकूनचं वागायला लागला. सखूला वाटलं कि आज काहीतरी झालंय. सकाळपासून आमचे हे काहीपण बोलत आहेत आणि आता कसं पण वागत आहेत. तिची सुद्धा य...

स्व-जाणीवेसाठी SWOT

इमेज
गंगेच्याकाठी असणाऱ्या अलाहबाद शहरात एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहायचा. त्याच्या वडिलांना कुस्तीचे फार अप्रूप. आपल्या मुलानं कुस्तीत नांव कमवावं, नावाजलेला पैलवान व्हावं असं त्याच्या वडिलांना मनापासून वाटायचं. ते त्याला रोज तालमीला पिटाळायचे. त्याच्याकडून भरपूर व्यायाम करून घ्यायचे. यामुळे मुलाचं शरीर मजबूत आणि पोलादी झालं. पण मुलाला कुस्तीत आजिबातच रस नव्हता. केवळ वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांचा मार मिळू नये म्हणून केवळ तो व्यायाम करायचा. त्याची आवड होती संगीत. जसजसा तो मोठं होऊ लागला तशी त्याची संगीताकडे ओढ अजूनच वाढायला लागली. हळूहळू त्याच्या लक्षात आलं, त्याला जाणीव झाली कि संगीतच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. वडिलांच्या आग्रहाखातर आपण कुस्ती शिकू, पैलवानही होऊ, पण आपल्याला त्यामध्ये समाधान मिळणार नाही. मनाचा हिय्या करून एकेदिवशी मुलाने आपल्या वडिलांना त्याला जे वाटतं ते सांगितलं. मुलाला कुस्ती आवडत नाही हे ऐकून वडिलांना वाईट वाटलं. पण तरी त्यांनी मुलाला संगीत शिकण्याची परवानगी दिली. हा मुलगा म्हणजेच जगविख्यात बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरासिया. हरीजींना त्यांच्या ‘स्व’ ची ज...

स्ट्रेस मॅनेजमेंट

काही दिवसांपूर्वी रोहितच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितलं, तुमचा रोहित आज आम्हाला शाळेच्या वेळेत गावाबाहेर फिरताना दिसला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण दोन-तीन जणांकडून पुन्हा असंच ऐकायला मिळाल्यावर मात्रं त्यांनी आज रोहितला याबद्दल विचारलं. सुरुवातीला तो हे मान्य करत नव्हता पण खडसावून विचारल्यावर आणि शाळेत चौकशी करण्याची तंबी दिल्यावर त्याने चूक कबूल केली. आणि मला शाळेत आजिबातच जायचं नाही असं सांगायला लागला. पालकांना अजिबातच कळत नव्हतं कि याला नेमकं झालंय तरी काय? अगदी रोज आवडीनं शाळेला जाणारा रोहित सहामाही नंतर असं का वागतोय हे त्यांना कळत नव्हतं.  तसा रोहित अभ्यासात, खेळात आणि गायनात हुशार होता. आत्ता पर्यंत झालेल्या शालेय परीक्षेत त्याला उत्तम गुण मिळाले होते. परंतु या सहामाही परीक्षेत त्याचे गुण विलक्षण फरकाने कमी झाले होते. पण शाळा, मित्रं, शिक्षक यावर तो फार बोलायचा नाही. त्याचे एका विषयाचे शिक्षक ‘त्याच्या मते’ त्याला उगाचच टार्गेट करत होते. आणि हि गोष्ट सलग २-३ महिने चालली होती. आणि त्यामुळे त्याची वर्गातली ‘इमेज’ खराब होत होती. शिवाय शिक्षक चिडवतात म्हंटल्यावर वर्गाती...

संवाद कौशल्य

इमेज
शिवाजी महाराजांनी जावळीच्या घनदाट खोऱ्यातील चंद्रराव मोरेची जहागीरी नेस्तनाबूत केली. त्यावेळी मोरेचा एक मावळा दोन्ही हाती दांडपट्टा घेऊन झुंझत होता. त्याच्या या आघातांमुळे महाराजांचा कोणताही सैनिक पुढे सरकू शकत नव्हता. अगदीच वेळ आली असती तर धनुष्यबाण चालवणाऱ्या सैनिकाला बोलावून त्या मावळ्याला हटवता आलं असतं. परंतु, महाराजांनी त्या वीर मावळ्याशी संवाद साधून आपलं, ‘श्रींचं’ स्वराज्य स्थापनेचं आपलं ध्येय त्याला इतक्या कुशलतेनं पटवून दिलं कि तो त्यानंतर स्वराज्याचा एकनिष्ठ पाईक बनला. पुढे तो मावळा किल्लेदार झाला. पुरंदरावर घडलेल्या त्याच्या स्वामीनिष्ठेच्या प्रसंगाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. त्या किल्लेदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे. शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर ते मुरारबाजीला धारातीर्थी पाडू शकले असते. पण त्यांनी वेगळा विचार केला. असा मोहरा मारण्यापेक्षा स्वराज्याच्या कामी आला पाहिजे हा विचार. हा वेगळा दृष्टीकोन. शिवचरित्रात असे योग्य दृष्टीकोन असणारे प्रसंग आपल्याला विपुल प्रमाणात दिसतात. या उदाहरणावरून वरून लक्षात येतं कि घडणाऱ्या किंवा घडलेल्या घटनेपेक्षा आपला त्या घटनेक...

स्लिप हायजीन

इमेज
मागच्या लेखात आपण झोपेचा डिसऑर्डर म्हणजेच इंसोमनिया बद्दलची प्रमुख लक्षणं जाणून घेतली आज आपण आपल्याला झोप उत्तम प्रतीची लागावी यासाठी असणारे काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.  हे मुद्दे इनसोमनिया असणाऱ्यांसाठी उपयोगाचे आहेतच; पण जर आपण सर्वांनी या मुद्द्यांचा वापर केला तर आपल्याला सुद्धा हे उपयोगी ठरतील. या मुद्द्यांना स्लिप हाइजीन असे म्हणतात. स्लिप हाइजीन म्हणजे झोप नीट येण्यासाठी करण्याचे किंवा पाळण्याचे नियम. आपण सोप्या भाषेत याला झोपेसाठीचे नियम असे म्हणूयात.  नियम पहिला झोपेच्या व्यतिरिक्त आपला बेड, अंथरूण अजिबात वापरू नका. याचं कारण आपल्या बेड सोबत आपल्या मेंदूच्या कनेक्शन फक्त झोपे पुरतच असलं पाहिजे. सध्या आपल्यापैकी अनेकांना ही सवय असू शकेल की ज्या बेडवर आपण झोपतो त्यावरच अभ्यासाला, कामाला, वाचनाला, गप्पा मारायला, जेवायला, टीव्ही-मोबाईल पहायला बसणं. यामुळे काय होतं? मेंदूच आपल्या बेड सोबत असणारं झोपेचं कनेक्शन तुटायला सुरुवात होते. म्हणजेच, आपल्या मेंदूला आपण बेडवर बसल्यावर किंवा झोपल्यावर आपल्याला आता झोप यायला पाहिजे असा संदेश मिळत नाही. कारण या बेडवर आपण बऱ्याच ...

झोपेची समस्या (इन्सोमनिया)

इमेज
 50 वर्षांचे भीमराव सांगत होते. "लॉकडाउन झाल्यानंतर लगेचच माझ्या व्यवसायावरती परिणाम झाला. तसा फार मोठा माझा व्यवसाय नाही पण साठवलेल्या पैशांवर त्या वेळचे दिवस काढले. मुलगा अजून शिकतोय त्यामुळे त्याच्यावर ही फार भार देता येत नव्हता. साधारण दोन ते अडीच महिने मी खूप ताणात होतो. त्यानंतर पुन्हा काम सुरू झालं; व्यवसाय सुरू झाला. पैसेही मिळू लागले. पण लॉकडाऊन दरम्यान गेलेली झोप मात्र काही परत आली नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस मी नीट झोपूच शकलेलो नाही. जर झोप लागलीच तरी पुन्हा लगेच जाग येते. रात्री झोप न झाल्याने सकाळी मी कामावर जाऊ शकेन का? व्यवस्थित काम करू शकेन का? मला चक्कर तर नाहीना येणार? या आणि अशा अनेक शंका मनात येतात. यामुळे, माझा कामावर जाण्याचा आत्मविश्वासच निघून गेलेला आहे. याचा परिणाम आता माझ्या व्यवसायावर होताना मला दिसू लागला आहे. झोप तर लागत नाहीये; व्यवसाय नीट करता येत नाहीये;  यामुळे मी अगदीच हतबल होऊन गेलो आहे. काय करावं काहीच कळेनासं झालेलं आहे. जस जशी रात्र जवळ येते तस तशी आता मला माझ्या झोपेचं काय होणार याची भयंकर चिंता वाटू लागते. मी काय करू? मला काहीच सुचत ना...

Worry Free Tree

इमेज
आज आपण चिंता कमी करण्यासाठी एक विशिष्ट टेक्निक पाहणार आहोत. ही टेक्निक अतिविचार करणाऱ्यांसाठी एक राम बाण उपाय आहे. या टेक्निकमुळे आपण उगाच काळजी म्हणजेच worry न करता आपली चिंता व्यवस्थित सोडवू शकू. चिंतेला सिस्टिमॅटिकली म्हणजेत पद्धतशीरपणे कमी करण्यासाठी चिंतेचा त्रास असणाऱ्यांना ही टेक्निक मदत करेलच त्याबरोबरच इतर सर्वांना आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करेल. या तंत्राचा नाव आहे चिंता घालवणार झाड इंग्रजीमध्ये यालाच वरी फ्री ट्री असे म्हणतात. आता आपण ही टेक्निक कशी आहे ते पाहूया. सर्वप्रथम आपल्याला यासाठी स्वतःला पहिल्यांदा एक प्रश्न विचारावा लागेल कि मी कोणत्या गोष्टीची काळजी किंवा चिंता करत आहे? हे उत्तर आपल्याला सहज मिळू शकेल. आपल्याला या गोष्टीचे उत्तर मिळाल्यानंतर, आपल्याला स्वतःला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे ही चिंता किंवा काळजी मी सोडवू शकतो का किंवा घालवू शकतो का? याची दोन उत्तरेतील एक म्हणजे हो मी सोडवू शकतो आणि दुसरं म्हणजे नाही मी सोडवू शकत नाही. यात प्रथमतः नाही हे उत्तर आलं तर काय करायचं ते पाहूयात. नाही उत्तर आल्यावर आपण स्वतःला सांगायचे आहे की जर की च...

विशिष्ट भय (फोबिया)

इमेज
तीस वर्षाची अरुणा आपल्या नवऱ्यासोबत माझ्या कौंसेलिंग सेंटर मध्ये येऊन बसली होती. बाहुल्यांची प्रचंड भीती वाटते अशी तिची तक्रार होती. प्रत्यक्षात बाहुली दिसली की तिला भीती वाटायचीच. पण जर टीव्हीमध्ये बाहुली दिसली तरी तिला त्रास व्हायचा. ती परिस्थिती अरुणा सहनच करू शकत नव्हती. त्या जागेवरून ती पळूनच जायची. तिचा चेहरा पांढरा फटक पडायचा. बाहुली किंवा बाहुलीचा चित्राची सुद्धा अरुणाला प्रचंड भीती वाटे. आपल्याला आजूबाजूला आपण असेल अनेक लोक पाहत असतो ज्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. काही जणांना उंचीचा त्रास होतो तर काहींना कुत्र्यांची भीती वाटते. काही लोक अंधाराला घाबरतात तर काही लोक सापांना, पालीला इ. माझ्या सेंटर असाही एक मुलगा आला होता ज्याला मासे खायची फार आवड होती. मेलेल्या माशांची अजिबात भीती वाटत नसे पण त्याला फिश टॅंक मधले मासे पाहून भीती वाटायची. अशा विशिष्ट गोष्टींच्या वाटणाऱ्या भीतीला फोबिया असं म्हणतात. फोबिया किंवा भय निर्माण करणारी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करणे; न टाळता आल्यास, त्या ठिकाणाहून शक्य तितक्या लवकर पळून जाण्याचा प्रयत्न करणे हे फोबियाचं प्रमुख लक्षण ...

ओ. सि. डी.

इमेज
मला सतत हात धुण्याची सवय लागली आहे. मला असं वाटतं की माझ्या हातावर घाण आहे. त्यात जंतू आहेत. आणि ते घालवण्यासाठी हात धुणे गरजेचेच आहे. नाहीतर मला काहीतरी होईल. असा विचार येऊन मी हात धुतो. थोडा वेळ बरे वाटते. पण नंतर काही काळाने पुन्हा हाच विचार येतो, कारण तेव्हा कुठेतरी हात इकडे तिकडे लागलेला असतो. पुन्हा हात धुतो आणि हे चक्र सुरूच राहते. त्यातून मी बाहेरच पडू शकत नाही. माझ्या कौन्सिलिंग सेंटर मध्ये नुकताच नोकरी सुरू केलेला सुनील मला त्याची समस्या सांगत होता. सुमेधाच्या ह्या समस्येला ऑबसेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर (ओ.सि. डी.) असं म्हणतात. ओ.सि. डी. म्हणजे पछाडलेल्या, मन व्यापून टाकलेल्या विचारांमुळे सतत करावी लागणारी अनिवार्य अशा कृतीची समस्या.   एका उदाहरणाने हे अजुन जास्ती स्पष्ट होईल. ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या दिनकर रावांना गाडी विषयी खूप प्रेम. पण त्याच वेळी ही गाडी चोरीला जाईल अशी चिंता हळूहळू त्यांच्या मनात घर करू लागली. त्यामुळे गाडी चालवून झाली की प्रत्येक दरवाजा मी नीट बंद केला आहे ना याची खात्री होण्यासाठी प्रत्येक दार ते तपासून ओढून पाहायला लागले. पुढची तपासणी झाली ...

शारीरिक चिंता

इमेज
माझ्या क्लिनिक मध्ये सुमेध माझ्याशी बोलत होता. वजन अगदीच कमी झालेलं दिसत होतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील आलेली होती. त्याच्या बोलण्यात निराशा दिसत होती. ‘माझ्या छातीत थोडसं दुखत होतं. मी ईसीजी काढला. ऍन्जिओग्राफी केली. सगळी उपलब्ध साधनं वापरून वेगवेगळ्या टेस्ट केल्या. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला काहीच झालेलं नाही. मी सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून दुसऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी अजून काही वेगळ्या टेस्ट सांगितल्या. त्याही केल्या. पण रिपोर्टमध्ये तरीही काहीच निघालं नाही. पण दुखणं तर होतचं. त्यामुळे मी पुन्हा नवीन डॉक्टरांना भेटलो. गेल्या वर्षभरात सहा-सात डॉक्टर झाले. पण सगळ्यांकडे रिपोर्ट नॉर्मल. शरीरात काहीच दोष नाही असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. मी काय करू? मला कळेनासं झालंय. कोणत्याच डॉक्टरांकडून समाधान झालं नाही म्हणून शेवटचा पर्याय मी इंटरनेट-गुगल वर याचा शोध घेतला. त्यात आलेल्या वेबसाइटनं असं सांगितलं की छातीत दुखत असेल तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि यामुळे माणूस मरुही शकतो. हे वाचल्यानंतर तर मला वाटू लागलं की आता मी मारणार. मी मेलो तर माझ्या कुटुंबी...

आनंदाचं सेलिब्रेशन

इमेज
T-२० विश्वचषक २०१६. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना. बांगलादेशला भारताच्या विरुद्ध T-२० सामन्याच्या पहिल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ३ बॉलमध्ये केवळ २ धावांची गरज होती. भारताने केलेल्या १४७ धावांच्या आव्हानातील १४५ धावा बांगलादेशने सहजपणे पूर्ण केल्या होत्या. बांगलादेशचा फलंदाज सामना पूर्ण झाल्याच्या अविर्भावात खेळत होता. तो खूप उत्साहित झाला होता. षटकार मारून आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी त्याने जोरात बॉल फटकावला. अति उत्साहामुळे बॉल त्याला नीट मारता आला नाही आणि षटकाराऐवजी भारताच्या खेळाडूच्या हातात सोपा झेल गेला. पुढे आलेला फलंदाज यातून काही धडा घेऊ शकला नाही. तो सुद्धा अशाप्रकारे बाद झाला. शेवटच्या बॉलवर आणखी एक फलंदाज रनआउट करून भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. भारत हा सामना जिंकला असं म्हणण्यापेक्षा बांगलादेश हा सामना हरला असंच म्हणावं लागेल. कारण जरी भारतीय कर्णधाराने ताणाचे समायोजन योग्य प्रकारे केले तरी हातात आलेली मॅच घालवण्यासाठी बांगलादेशी फलंदाजांनी लवकर सुरु केलेल्या मॅच जिंकण्याच्या आनंदाच्या सेलिब्रेशनमुळे त्यांचे उरलेल्या धावा काढण्यामागचे लक्ष उडाले ...

सामाजिक चिंता

इमेज
‘गेली 15 वर्ष मी ज्या ठिकाणी काम करतो ते माझं ऑफिस सोडायचा मी विचार करतोय. कारण, माझ्या मागून आलेली मुलं छान पद्धतीने लोकांना काम सांगतात, कामगारांकडून काम करवून घेतात आणि मला हे अजिबात जमत नाही. लोकांसमोर उभं राहून बोलायची मला प्रचंड भीती वाटते. ते काय म्हणतील? माझ्याबद्दल चुकीचं मत तरी ते करून घेणार नाहीत ना? ते मला चुकीचे ठरवणार नाहीत ना? असे असंख्य प्रश्न लोकांसमोर मी बोलायला उभा राहिलो, लोकांशी मी बोलायला लागलो की माझ्या मनात येतात. यामुळे मी माझ्या बॉसना पण नीट उत्तर देऊ शकत नाही आणि याचा परिणाम माझं प्रमोशन पण होत नाही.’ माझ्या क्लिनिकमध्ये बंडोपंत मला त्यांच्या ऑफिसमधल्या वर्तनाबद्दल सांगत होते. ‘ऑफिसच काय घेऊन बसलात माझ्या मित्रांसमोर सुद्धा अनेकदा माझं असं होतं. बँकेत सगळ्यांसमोर चेकवरची सही सुद्धा माझी बर्‍याचदा चुकली आहे. लोक समोर आले की माझी भीतीने गाळण उडते.’ बंडोपंतांना होणाऱ्या या त्रासाला मानसोपचार शास्त्रात सामाजिक चिंतेची समस्या म्हणजेच सोशल एन्झायटी डिसऑर्डर असं म्हणतात. आपल्याला काही सामाजिक प्रसंगात भीती वाटते, आपण खरंच अस्वस्थ होतो, आपल्या पोटात गोळा येतो. उदा....

प्लॅस्टिकसारखे मज्जातंतू आणि मेंदू

इमेज
     प्लॅस्टिकसारखे मज्जातंतू हे वाचताना थोडं वेगळं नांव वाटलं ना? काही जणांना कदाचित विचित्रसुद्धा वाटू शकेल. पण खरोखर आपल्या मेंदूतले मज्जातंतू प्लॅस्टिकसारखेच असतात. मेंदूतील साधारण ८०% भाग हा मज्जातंतूंचाच बनलेला आहे. हे मज्जातंतू आपल्या मेंदू मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांसारखे किंवा वायरिंग सारखे असतात. आपल्या विचार- भावना- वर्तणुकीवर मज्जातंतूंचा प्रभाव हा जास्त आहे. प्लॅस्टिक आपण गरम केलं कि हवं तसं वाकवू शकतो, त्याला हवा तसा आकार देऊ शकतो अगदी तसंच आपण जर आपण कष्ट घेतले तर आपल्याला मेंदूतील मज्जातंतूंना जसे हवे आहेत तसे बदलू शकतो. याला इंग्रजी मध्ये न्युरोप्लास्टिसिटी असं म्हणतात.      न्युरोप्लास्टिसिटी नुसार, जेंव्हा आपण एखादी नवी गोष्ट शिकतो तेव्हा आपण आपल्या मेंदूमध्ये मज्जातंतूंची एक पाउलवाट तयार होते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पाऊलवाटेने प्रवास करायला रस्त्यापेक्षा नक्कीच जास्त वेळ लागतो. त्या पाऊलवाटेचे रुपांतर रस्त्यामध्ये करायचे असेल तर आपल्याला ती पाउलवाट सतत वापरावी लागते. खूप दिवस ती पाउलवाट वापरल्यानंतर हळूहळू त्याचा कच्चा रस्त...

कसा थांबवायचा चालढकलपणा?

इमेज
लहानपणी आपण सगळ्यांनी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. अजून थोडं पळाल्यानंतर आपण जिंकू हे माहिती असून सुद्धा सशाने पळण्याचा कंटाळा केला. त्यामुळे कमी वेगात पण न थांबता चालणार कासव जिंकलं. ससा आणि कासवाची ही गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेला चालढकलपणाचा पहिला धडा होता. सध्याच्या वेगवान युगात, आपल्या ऊर्जेचे सर्वात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते म्हणजे चालढकलपणानं.  चालढकलपणा म्हणजे महत्त्वाची कामे टाळून शुल्लक गोष्टी करत बसणं. हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. पहाटे उठून व्यायाम न करता झोपून राहणं, अभ्यास महत्वाचा आहे हे माहिती असून सुद्धा सतत टीव्ही पाहत राहणं अशी काही चालढकलपणाची उदाहरणे आहेत. याबरोबरच आपल्याला आवडणारी पण हानिकारक किंवा शुल्लक असणारी एखादी गोष्ट आपली गैरसोय होईल, कदाचित आपल्याला बैचेन वाटेल या चिंतेमुळे आपण न थांबता करत राहतो यालाही चालढकलपणाच म्हणतात. फेसबूक, व्हॉट्सऍप, पबजी, व्यसनं ही या चालढकलपणाची काही उदाहरणे आहेत. चालढकलपणामुळे आपला वेळ आपण वाया घालवतो आणि अगदी शेवटच्या क्षणी घाई गडबडीत आपलं काम आपण पूर्ण करतो. बहुतेक कॉलेजमधली मुलं त्यांच्या असाईनमे...

विचार, भावना आणि समस्या

इमेज
आज आपण आपल्या विचार आणि भावनांवर चर्चा करणार आहोत. सहाजिकच आपलं ध्येय मानसिक आरोग्य टिकवणे असे असल्याने प्रामुख्याने आपण मानसिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावनांचा विचार करू. हा विषय मांडताना कॉग्नेटिव्ह बिहेविअरल थेरपी (विचार-वर्तन-मानसोपचार पद्धती) म्हणजेच CBT विचार आणि भावनेकडे कोणत्या दृष्टीने पाहते आणि विचार आणि भावनांचा उपचार सीबीटी मध्ये कसा केला जातो याविषयी सुद्धा पाहणार आहोत. भावना म्हणजे काय आणि भावनांचा उगम सीबीटी नुसार विचारांच्या मुळे होणारी मनाची अवस्था म्हणजेच भावना होय. याचाच अर्थ भावनेचा उगम हा विचारांमध्ये असतो. जसा आपण विचार करतो तशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि ही भावनाच आपल्याला वर्तन करण्यासाठी प्रेरित करत असते. यालाच विचार-भावना-वर्तन त्रिकोण असे म्हणतात.  याचाच अर्थ एखाद्या प्रसंगातील आपले वर्तन हे त्या प्रसंगात घडणाऱ्या घटनांमुळे होत नसते. तर त्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो आणि काय विचार करतो यावर अवलंबून असते. हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा वापर करू. यश ने एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घ...